पोलादपूर – क्षेत्रपाळात खेकडा पालन

वडीलांच्या निधनानंतर सख्ख्या भावंडांचा उपक्रम
पोलादपूर । वार्ताहर ।
पोलादपूर तालुक्यातील निसर्गाच्या सान्निध्यातील व्यवसाय उपजिविकेचे साधन ठरू शकेल, अशा प्रकारचे प्रायोगिक व्यवसाय स्थानिक तरूणांनी शोधून झोकून देत मेहनत केल्यास नोकरीनिमित्त शहरांच्या आश्रयाला जाऊन गावातील शेतजमिनी ओसाड आणि घरं निमर्नुष्य करण्याची आवश्यकता राहणार नसल्याचे मत क्षेत्रपाळ येथील तरूण सख्खे भाऊ प्रमोद प्रकाश पार्टे आणि सुशील प्रकाश पार्टे यांनी व्यक्त केले. दोघा सख्खा भावंडांनी कोरोना काळात वडील गमावले. मात्र, त्यांच्या विम्याच्या थोडया फार पैशातून हा व्यवसाय उभारल्याचे प्रांजळपणे सांगून तालुकावासियांना या व्यवसायाचे नियमित ग्राहक होण्याचे नम्रपणे आवाहन केले आहे.

क्षेत्रपाळच्या खेकडा पालन केंद्रामध्ये लाल पंजा किरवी, मुठे, मुरे, चिंबोरी या खेकडयाच्या प्रजाती असून हिचा आकार हिरव्या मातीच्या खेकडयापेक्षा लहान आहे. या खेकडयाची जास्तीत जास्त 13 सेटीमीटर पर्यंत वाढ होते आणि याचे वजन 1 किलो 200 ग्रॅमपर्यंत वाढते. या प्रजातीच्या खेकडयाला मातीमध्ये बुजवून घेण्याची सवय असल्यामुळे त्याच्या अंगावर बहूभुज खुणा आढळतात. हॉटेल व्यवसायामध्ये तसेच कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये या खेकडयांना मोठी मागणी असल्यामुळे बाजारभाव ही चांगला मिळत असतो, अशी माहिती देऊन प्रमोद प्रकाश पार्टे यांनी या खेकडा पालन केंद्रातील खेकडयाचे मानवी शरीराला लाभ खुप असल्याची माहिती दिली.

खेकडयांच्या शरीरमध्ये मिनरलचे प्रमाण जास्त आहे; त्यामुळे आपल्या शरीरातील ऑॅक्सिडंटमुळे होणारे नुकसान कमी होण्यास मदत होते. हार्टऍटॅकचा धोका कमी होतो. खेकडयांमध्ये ओमोनो 3 फॅटी ऍसिड, नायसिन आणि क्रोमियमचे प्रमाण आढळते, त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल प्रमाण कमी होण्यास मदत होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढते: निरोगी आणि उत्तम आरोग्य राहण्यासाठी खेकडयाचे सेवन फायदेशीर आहे. सर्दी, खोकला, क्षातीमध्ये काफा झाल्या असेल तर याचा त्रास लगेच कमी होतो. खेकडयाचे सेवन प्रोटीन मिळवण्यासाठी चांगले आहे. खेकडयामध्ये विटामीन बी12 चे प्रमाण आढळते त्यामुळे रक्तपेशींची निर्मिती वाढते. खेकडयाचे सेवन केल्याने एनीमियाचा दोखा कमी होतो.वजन कमी करण्यास खेकडा फायदेशीर आहे. गुडघे आणि सांधेदुखी याचा उपचारासाठी याचे सेवन केले जाते. रक्तदाब नियंत्रित राहतो, असे या खेकडयाचे लाभ असल्याचे यावेळी प्रमोद प्रकाश पार्टे यांनी सांगितले.

Exit mobile version