गोगावलेंच्या भूमिकेने पोलादपूर शिवसेनेत दुफळी?

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
राज्यातील बदलत्या राजकारणाचे पडसाद आता गावपातळीवरही उमटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष करुन महाड,पोलादपूर तालुक्यात आ. भरत गोगावले यांच्या बदलत्या भूमिकेने शिवसेेनेत दुफळी पडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आ. गोगावले यांचा महत्वपूर्ण सहभाग पाहता राज्यातील राजकीय परिस्थिती शांत होऊन सत्तेचे चित्र स्पष्ट होईपर्यंत आ. गोगावले यांना त्यांच्या महाड व पोलादपूर मतदार संघाकडे लक्ष देता येणे शक्य नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे, शिवसैनिकांसह विविध राजकीय पक्षांनी वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिकेतून मौन बाळगले असून कोणीही या अस्थिर राजकीय परिस्थितीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत नाही.

पोलादपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या दोन जागा आणि पोलादपूर पंचायत समितीच्या चार जागांसह वझरवाडी, तुर्भे खोंडा, तुर्भे बुद्रुक आणि तुर्भे खुर्द या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या असून राज्यातील सत्ताबदलासह राजकीय समीकरणे बदलण्याच्या शक्यतेमुळे सर्वच राजकीय पक्ष एक अवाक्षरही या घडामोडींवर बोलण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.

आ. गोगावले यांनी घेतलेल्या भूमिकेला सत्तेशी आणि पक्षाशी बंडखोरी असे समजले जात असले तरी विधीमंडळ पक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळते अथवा कसे, यावरच या बंडखोरी अथवा पक्षनिष्ठेबाबत शिक्कामोर्तब होऊ शकणार असल्याने सद्यस्थितीत सर्वच राजकीय पक्ष मौन बाळगून असल्याचे दिसून येत आहेत.

Exit mobile version