आंबेनळी घाटातील रस्तारूंदीकरणावर झाडं कोसळली
| पोलादपूर | प्रतिनिधी |
रविवारी पावसाने रात्रभर झोड उठविल्याने सोमवारी सकाळी पोलादपूर तहसिल कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्षामध्ये गेल्या चोवीस तासांत पावसाची 94 मि.मी.नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली. रविवारी दिवसभरामध्ये दोन घरांचे नुकसान झाल्याचे तसेच तालुक्यातील पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर रस्त्यावर सुरू असलेल्या रस्तारूंदीकरणावर झाडं कोसळल्याच्या घटना झाल्यामुळे एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर आंबेनळी घाटरस्ता पावसाळयात असुरक्षित झाला असूनही याबाबत संबंधित यंत्रणांनी दुजोरा न दिल्याने या घाटातून वाहतुकीदरम्यान मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागल्याशिवाय या धोक्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार नाही, हे उघड झाले आहे.
रविवारी दिवसभर झालेल्या 94 मि.मी. पावसामुळे दोन ठिकाणी झाडं आणि मातीचे ढिगारे या रूंदीकरणाच्या रस्त्यावर कोसळल्याने सोमवारी सकाळी आंबेनळी घाट झाडं कोसळलेल्या ठिकाणी एकेरी वाहतुकीसाठी खुला राहिला. ठेकेदारांनी झाडे आणि मातीचे ढिगारे हटविल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाली. रस्ता रूंदीकरणाच्या कामाच्या ठिकाणी खणलेल्या साईडपट्टीलगत सिमेंटच्या रिकाम्या गोणींमध्ये माती भरून संरक्षक कठडे उभे करण्यात आल्याचा आभास निर्माण केला आहे. याठिकाणी तीव्र वळण उतारांलगत खणलेल्या साईडपट्टयावर वाहने जाऊन अपघात झाले असून, त्याबाबत कोणतीही तक्रार केली गेली नसल्याने या प्रश्नाचे गांभीर्य मोठ्या अपघातानेच अधोरेखित होणार असल्याचे स्पष्ट आहे. रविवारी वादळी पावसामुळे पळचिल गोलदरा येथील रमेश राजाराम शेलार यांची घराची भिंत कोसळली असून, कुडपण येथील मंगल पांडुरंग चिकणे यांच्या घराच्या बाजूची संरक्षक भिंत कोसळून पडवीचे पत्रे उडाले आहेत.