। पालघर । प्रतिनिधी ।
नालासोपार्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तुळींज पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने अमली पदार्थ विक्रेत्याकडून दरमहा 50 हजारांची लाच मागितली होती. ती लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगेहाथ अटक केली. विठ्ठल सागळे (34) असे पोलीस शिपायाचे नाव असून तो तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
तक्रारदार हा एमडी (मॅफेड्रॉन) नावाचा अमली पदार्थ विक्री करतो. त्याला तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थाची विक्री करायची होती. त्याला पोलीस शिपाई विठ्ठल सागळे याने संपर्क केला. जर माझ्या हद्दीत अमली पदार्थ विक्रीचा हा धंदा सुरू ठेवायचा असेल तर महिन्याला 50 हजार रुपये द्यावे लागतील. तसेच, पैसे न दिल्यास कारवाई करून तुरुंगात टाकण्याची धमकीदेखील पोलीस शिपायाने दिली होती. याबाबत त्याने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकाकडे तक्रार केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत विठ्ठल सागळे याने 50 हजारांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर शुक्रवार दि. 28 फेब्रुवारी रोजी रात्री तुळींज पोलीस ठाण्यात सापळा लावून लाचेची 50 हजारांची रक्कम पान टपरी विक्रेता आदर्श गुप्ता याच्या मार्फत स्विकारताना सागळे आणि गुप्ता याला अटक करण्यात आली. पोलीस शिपाई विठ्ठल सागळे याच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.