रायगडात 2137 प्रवेश निश्चित, 2441 जागा शिल्लक
| रायगड | खास प्रतिनिधी |
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के आरक्षित जागांसाठी राबवण्यात येत असलेल्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना 1 ते 10 मार्च या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 137 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. अद्यापही दोन हजार 441 जागा शिल्लक आहेत. पालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी केले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009’ नुसार (आरटीई) शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई प्रवेश मुदतवाढीसंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. यंदा राज्यातील 8 हजार 853 शाळांमधील 1 लाख 9 हजार 87 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी 3 लाख 5 हजार 152 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. ऑनलाइन सोडतीद्वारे 1 लाख 1 हजार 967 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला. रायगड जिल्ह्याचा विचार केल्यास 266 शाळांमध्ये चार हजार 578 राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. राखीव जागांसाठी नऊ हजार 680 अर्ज आले आहेत. त्यानुसार चार हजार 193 विद्यार्थ्यांचा प्रवेश जाहीर करण्यात आला. तसेच दोन हजार 137 विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करण्यात आला. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करून प्रवेशासाठी 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर प्रवेश जाहीर झालेल्या उर्वरित विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियेत पालकांच्या निवासी पत्त्याच्या पुराव्याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्यानुसार स्वत:च्या मालकीची निवास व्यवस्था असलेल्या पालकांना शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, वीज देयक, दूरध्वनी देयक, मिळकतकर देयक, घरपट्टी, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यापैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. तर स्वत:च्या मालकीची निवासव्यवस्था नसलेल्या पालकांना ते ज्या क्षेत्रातील शाळा निवडत आहेत, त्या क्षेत्रातील निवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, वीजदेयक, दूरध्वनी देयक, मिळकतकर देयक, घरपट्टी, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आधारकार्ड, राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक यांपैकी कोणताही पुरावा ग्राह्य धरावा. अधिक स्पष्टीकरण हवे असल्यास पडताळणी अधिकार्याने पालक राहात असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन खात्री करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.