| मुंबई | दिलीप जाधव |
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विधान भवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिभाषण झाले. यात सरकारच्या विकासकामांचा ऊहापोह करण्यात आला. योजनांचा आढावा घेण्यात आला. यात कोकण मात्र कुठे दिसला नाही. नेहमीप्रमाणे यावेळीही कोकणाच्या तोंडाला पाने पुसण्यात आली आहेत.
नागपूर-गोवा शक्तिपीठ द्रुतगती मार्गाच्या बांधकामासाठी तब्बल 86 हजार 300 कोटी अंदाजित खर्च होणार आहे. मात्र, गेली दहा वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा साधा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात केलेला नाही. रायगडमध्ये येऊ घातलेला बल्क ड्रग पार्क गुजरातकडे गेला. आज रायगडात रोजगारवाढीसाठी कुठलाही उद्योग नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी जागतिक आर्थिक परिषदेसाठी डावोसला जाऊन आले. यावेळी 63 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी 15 लाख 72 हजार कोटी रुपये इतक्या परदेशी गुंतवणुकीमध्ये रायगड सोडाच; संपूर्ण कोकणात कुठलाही प्रकल्प आला नाही.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यांनी अद्याप आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नाही. मात्र, काँग्रेसचे आमदार सुनील केदार असो वा राहुल गांधी यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात आली. याची चर्चा आज विधिमंडळात झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा चर्चेत आणला. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, न्यायालयाकडून निर्णय झाल्यानंतर त्यावर आम्ही निर्णय घेऊ.