28 आरोपींनी न्यायालयीन कोठडी
| खास प्रतिनिधी | रायगड |
अलिबाग तालुक्यातील बेकायदा कॉल सेंटरप्रकरणी 35 आरोपींपैकी सात आरोपींनी 28 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, तर उर्वरित 28 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींची पोलीस कोठडीतील मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
उत्तेजक औषधे विक्रीसाठी अमेरिकन नागरिकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतारराष्ट्रीय टोळीचा अलिबाग पोलिसांनी गुरुवारी पर्दाफाश केला होता.
यातील प्रमुख आरोपी रोहित बुटाने हा गुजरातला फरार झाल्याने पोलिसांसमोर त्याला हुडकून काढण्याचे मोठे आव्हान आहे. दरम्यान, न्यायालयात हजर केलेल्या आरोपींपैकी सात आरोपी हे काही तांत्रिक माहिती लपवत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून रोहित बुटानेसह अन्य व्यवहाराबाबतची माहिती पोलिसांना मिळणे अपेक्षित आहे. याच कारणांसाठी पोलिसांनी न्यायालयापुढे सात आरोपींची पोलीस कोठडीची मुदत दुसऱ्यांदा वाढवून मागितली आहे.
आरोपींकडून सापडलेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सायबर सेलकडून कसून तपास करण्यात येत आहे. न्याय वैद्यक विभागाचा अहवाल येण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे. मात्र, पोलीस यावर थांबलेले नाहीत. त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरुच ठेवला आहे. त्यांना मिळणाऱ्या धोगदोऱ्यांची ते पडताळणी करीत आहेत. लवकरच यातील प्रमुख आरोपीच्या मुसक्या आवळण्यात अलिबाग पोलिसांना यश मिळेल, असा विश्वास असल्याचे बोलले जाते.