मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
| धाटाव | वार्ताहर |
कोकण रेल्वे मार्गावरील कोलाडजवळील तिसे गावाच्या रेल्वे फाटकावर गेटमन चंद्रकांत कांबळे यांच्या हत्येचा माग काढण्यात पोलिसांना 24 तास उलटून गेले तरी यश आलेले नाही. जोपर्यंत मारेकरी सापडत नाहीत, तोपर्यंत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, असा इशारा रोह्यातील दलित संघटनांनी दिल्याने या परिसरात मंगळवारी (22 ऑगस्ट) मोठा तणाव निर्माण झाला. दरम्यान, या हत्येच्या शोधासाठी पोलिसांची सात पथके तैनात करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
कांबळे यांची अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हत्या करून खुनी इसमाने घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान, या घटनेला 24 तास उलटून गेले तरी खुनी व्यक्तीचा थांगपत्ता लागत नसल्याने दलित पँथर संघटना आक्रमक झालेली आहे.जोपर्यंत आरोपींचा शोध लागत नाही, तोपर्यंत आम्ही चंद्रकांत कांबळे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा युवा दलित पँथरचे अध्यक्ष भाई जाधव आणि तिसे गावचे सरपंच राकेश कांबळे यांनी दिला आहे.
कडकडीत बंद बौद्ध समाज व बहुजन समाज बांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची हत्या झालेल्या निषेधार्थ येथील व्यापारी बांधवांनी कोलाड बाजारपेठ बंद ठेवली होती. त्यांचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा आंबेडकरी नेत्यांनी घेतल्याने नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
आठ तपास पथके तैनात हत्येचे वृत्त समजताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुलकुमार झेंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीची धरपकड करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. यासाठी आठ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. अज्ञात आरोपीने चंद्रकांत कांबळे यांचा खून करण्यापूर्वी पूर्वनियोजित कट रचला असल्याचे दिसते. ते ड्युटीवर एकटेच असतात, तसेच ज्यावेळी तिसे रेल्वे फाटकावर गावाकऱ्यांची वर्दळ नसते अशा वेळेतच अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कांबळे यांचा खून करण्यात आला आहे. कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील धडाडीचे सक्रिय कार्यकर्ते होते. नुकताच झालेल्या रेल्वे संघटनेच्या निवडणुकीत त्यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले होते. पूर्ववैम्यनस्यातून त्यांची हत्या करण्यात आली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. खुनाचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड, बीडीडीएस टीम, फिंगर एक्सपर्ट टीम या सर्व टीमला पाचारण करून त्यांच्यामार्फत घटनास्थळी तपासणी केली आहे.
चंद्रकांत कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. तसेच ते कोकण रेल्वे कर्मचारी संघटनेवर पदाधिकारी म्हणून काम करत होते. तसेच कोलाड विभाग बौद्ध समाज कार्याध्यक्ष म्हणून काम करीत होते. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीला बेड्या ठोकण्यात याव्या.
राकेश कांबळे, सरपंच, तिसे ग्रामपंचायत
चंद्रकांत कांबळे यांच्या मारेकऱ्याला जोपर्यंत अटक करत नाहीत, तोपर्यंत आम्ही मयत कांबळे यांचे शव ताब्यात घेणार नाही. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची अशी दिवसाढवळ्या हत्या व्हावी हे भयानक आहे. फरार मारेकराचा शोध लागलाच पाहिजे.
भाई जाधव, दलित पँथर यूथ अध्यक्ष, महाराष्ट्र