| छ.संभाजीनगर | प्रतिनिधी |
बजाजनगर येथील उद्योजक लड्डा दरोडा प्रकरणातील मुख्य आरोपीचा पाठलाग करताना पोलीस व आरोपीमध्ये चकमक झाली. यावेळी त्या शस्त्रधारी आरोपीने पोलिसांवर फायरिंग केली. यामध्ये पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात आरोपीचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.27)पहाटे तीन वाजेच्या सुमारास वडगाव कोल्हाटी परिसरात घडली. अमोल खोतकर रा. पडेगाव असे एन्काऊंटर मध्ये ठार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर नुकताच दरोडा घालण्यात आला होता. 7 मे रोजी ते कुटुंबियांसह अमेरिकेला गेले होते. त्यांच्या विश्वासू संजय झळके हा केअरटेकर म्हणून बंगल्यात काम करत होता. 15 मे रोजी रात्री 2 ते 4 या दरम्यान 6 दरोडेखोरांनी पिस्तुलाच्या धाकावर या बंगल्यातून साडेपाच किलो सोने आणि 32 किलो चांदी असा 6 कोटींचा ऐवज लंपास केला होता. या दरोड्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. वाळूज एमआयडीसी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. 11 दिवसांपासून गुन्हे शाखेचे 7 आणि एमआयडीसी वाळूज ठाण्यातील 2 अशी पथकं तपास करत होती. त्याचवेळी अमोल खोतकर हा कोल्हाटी भागातील कचरापट्टी भागात लपल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्याला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले होते. मध्यरात्री त्याला अटक करण्याची तयारी करण्यात आली होती. या दरोडा प्रकरणात पोलिसांनी तपासाअंती 5 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर या दरोड्याचा अमोल हा सूत्रधार असल्याचे समोर येत होते. त्याला अटक करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. त्यातच तो वडगाव कोल्हाटी परिसरात असल्याचे समोर आले होते. त्याला अटक करण्यासाठी गुप्तता बाळगण्यात आली होती. काल मध्यरात्री पोलिसांनी तो असलेल्या परिसराला गराडा घातला. त्याची चाहुल आरोपीला लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पकडल्या जाण्याच्या भीतीने त्याने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. पोलिसांनी बचावाची काळजी घेत त्याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात संशयीत आरोपी अमोल खोतकर याचा मृत्यू झाला.