अमली पदार्थ तस्कर पोलिसांच्या रडारवर

| अलिबाग | प्रमोद जाधव |
रायगड जिल्ह्यातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जाण्याचा धोका वाढला आहे. अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याबाबत कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. बंद असलेल्या कारखान्यावरील संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अमली पदार्थ तस्करी करणारे पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

रायगड जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो . पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील जिल्ह्याला महत्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात सुमारे 12 हजार कारखाने आहेत. त्यामध्ये 19 मेगा कारखान्यांचा समावेश असून महाड, रोहा, तळोजा या परिसरात सुमारे दोनशेहून अधिक रासायनिक कारखाने आहेत.

जिल्ह्यात औद्योगिकीकरण वाढत असताना, वेगवेगळ्या कारणांमुळे काही कारखाने बंद आहेत. या बंद कारखान्यांचा आधार घेऊन अंमली पदार्थांची तस्करी होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात सप्टेंबरपासून बंद कारखान्यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. बंद कारखान्यांची तपासणी वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आली. तेथील संशयित हालाचालीवर लक्ष ठेवण्यात आले.

अमली पदार्थांच्या तस्करीमुळे तरुण पिढी बरबाद होण्याची भीती निर्माण झाल्याने ही पावले उचलण्यात आली. रायगड जिल्ह्यातील बंद कारखान्यांचा आढावा घेण्याचे काम पोलिसांमार्फत सुरु आहे. या तपासणीत खोपोली येथील ढेकू गावातील बंद कारखान्याचा वापर अमली पदार्थ तयार करण्यासाठी केला जात आहे, हे उघड झाले. यामध्ये कल्याण येथील कमल जैसवानी, संभाजीनगरमधील मतीन बाबू शेख, ठाण्यातील ॲथोनी करुकुटीकरण या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुुनावण्यात आली आहे.

अमली पदार्थांचे धागेदोरे गावोगावी, पान टपरीपर्यंत पोहचत आहेत. त्यांच्याविरोधात मुकाबला करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. दर महिन्याला बैठका घेऊन ही तस्करी रोखण्यासाठी उपाय केले जात आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून बंद कारखान्यांची माहिती घेण्याची मोहिम हाती घेतली आहे. पुढील पिढीला या संकटापासून वाचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. नागरिकांनी देखील आजूबाजूला घडत असलेल्या संशयित हालचालीची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करावे.

सोमनाथ घार्गे – पोलीस अधीक्षक, रायगड
Exit mobile version