कर्जतमध्ये पोलीस मित्र संघटनेचे आंदोलन

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरात असलेल्या उपजिल्हा रुग्णालयासंबंधी अनेक समस्यांना रुग्ण तसेच नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्याचवेळी कर्जत नगरपरिषदेकडून नागरी सुविधांबाबत सहकाऱ्याची भूमिका बजावली जात नाही. त्यामुळे पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी शहरातील लोकमान्य टिळक चौकात बुधवार, दि.25 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले आहे.

कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात अनेक रुग्णांना औषधे उपलब्ध नसल्याचे कारण सांगुन बाहेरून औषधे आणायला लावतात. बेबी वाघमारे गौरकामथ या आदिवासी महिलेची नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी पाठवले गेले. मात्र, वेळेत उपचार न झाल्यामुळे त्यात तिचा मृत्यू झाला, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. ज्येष्ठ नागरिकांना मुद्दाम फिटनेस सर्टिफिकेटवर जावक नंबर न टाकता सर्टिफिकेट देऊन त्यांची फसवणूक होते. तसेच, रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षकांनी ऑक्टोबर, 2025मध्ये डॉ. किरण सोनावने यांच्या खासगी दवाखान्यात धाड टाकून उपजिल्हा रुणालयातील औषधे पकडली, त्या संदर्भात कोणती कायदेशीर कारवाई केली, याची माहिती दिली जात नाही. अशा विविध फसवणूक व गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी रमेश कदम यांनी केली आहे. त्याचबरोबर नगरपरिषदेत बांधण्यात आलेल्या नाट्यगृहाच्या दयनीय अवस्थेची चौकशी व्हावी. नगरपरिषद हद्दीतील सर्व अनधिकृत अतिक्रमणांवर आणि गृहनिर्माण संस्थेतील पार्किंग जागेवरील सर्व प्रकारच्या अतिक्रमणांवर कायदेशीर कारवाई करावी. नगरपरिषद हद्दीतील सर्व शौचालयात पाण्याची व्यवस्था, शौचालयाची दररोज स्वच्छता करण्यात यावी आणि महिलांसाठी आवश्यक स्वतंत्र नविन शौचालयाची सुविधा करण्यात यावी. शुक्रवार बाजार आणि दररोजचे भाजीपाला विक्रेते, फल विक्रेते व फेरीवाले विक्रेते यांचा बाजार एकच ठिकाणी भरवावा, अशा अनेक मागण्यांसाठी हे उपोषण सुरू आहे.

Exit mobile version