| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कोपरखैरणे पोलिसांना एका बॅगमध्ये चार ते पाच दिवसांचे स्त्री जातीचे बाळ सापडले आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास मास्कने चेहरा झाकलेला एक अनोळखी इसम घणसोली, सेक्टर 3, लक्ष्मी हॉस्पिटल व वनलाईट फिटनेस हब या दरम्यानच्या कॉमन जागेमध्ये असलेल्या रॅकवर एका चार ते पाच दिवसांच्या स्त्री जातीच्या बाळाला रेगझिन बॅगेमध्ये सोडून गेला. त्यानंतर बाळ रडत होते. नागरिकांनी ही बॅग उघडली असता त्यात त्यांना लहान बाळ दिसून आले.
याची माहिती त्यांनी कोपरखैरणे पोलिसांना दिली. पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेतले व त्याला रुग्णालयात दाखल केले. या बाळाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर या बाळाला विश्व बालक केंद्र, नेरूळ या ठिकाणी ठेवण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी अज्ञाताविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.