कार्ले गावात येणाऱ्या गोळ्यांचं गुपित उघडण्यासाठी पोलिसांची पाहणी

कार्लेकर होणार गोळी भयमुक्त
। अलिबाग । भारत रांजणकर ।
अलिबाग तालुक्यातील परहूर पाडा येथील पोलिसांच्या गोळीबार सरावावेळी डोंगरापलिकडील कार्ले गावात येत असलेल्या बंदुकीच्या गोळ्याचं गुपित उलगडण्यासाठी रायगड पोलिसांच्या पथकाने पाहणी केली आहे. त्यानुसार चुकीच्या पद्धतीने गोळीबार केल्यास गोळी कार्ले गावात जाण्याची शक्यता असल्याचे निदर्शनात आले आहे. कार्ले गावात गोळ्या जाऊ नयेत यासाठी तज्ज्ञाकडून मार्गदर्शन घेवून आवश्यक त्या उपाय योजना करण्यात येणार आहेत असे जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले. कार्ले गावात येणाऱ्या गोळ्या रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलली जात आहे. त्यामुळे कार्ले गावात गोळीबाराबाबत निर्माण झालेली भीती मिटण्याची आशा निर्माण झाली आहे.

परहूर पाडा येथे पोलिसांचे गोळीबार सराव बट आहे. कार्ले गावात जात असलेल्या बंदुकीच्या गोळीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक प्रकाश मोकल, पोलीस कर्मचारी हे पाहणी साठी उपस्थित होते. परहूर पाडा येथे रायगड, नवी मुंबई, ठाणे, मुंबई पोलीस कर्मचारी बंदुकीच्या गोळीबार सरावासाठी येत असतात. परहूर पाडा येथे शंभर, दोनशे आणि तीनशे मीटर रेंजचा गोळीबार सराव केला जातो. मात्र हा सराव करताना समोर असलेल्या डोंगराच्या पलिकडील कार्ले गावात गोळ्या जाण्याच्या घटना गेली चार वर्षांपासून घडत आहेत. कार्ले गावात येणाऱ्या गोळ्याने अद्याप पर्यत कोणीही जखमी अथवा जीवितहानी झालेली नाही. मात्र येणाऱ्या गोळ्यामुळे कार्लेकर हे भयभीत झालेले आहे. चार दिवसापूर्वीही सरावाची मारलेली गोळी कार्ले गावातील दोन घरात घुसली होती.

कार्ले गावात येत असलेल्या गोळ्यामुळे परहूर पाडा येथील सराव बट बंद करण्याची मागणी कार्ले ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत कार्ले गावात गोळी जाते कशी याबाबत पाहणी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी अलिबाग पोलिसांना दिले होते. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. नव्याने बांधण्यात आलेली भिंतीची उंची आणि टार्गेट ठिकाण यामध्ये काही प्रमाणात तफावत आहे. त्यामुळे उभ्याने टार्गेट शूट करताना चुकून कर्मचाऱ्याची दिशा बदलली तर गोळी सुसाट वेगाने डोंगर पार करून कार्ले गावात जात आहे. त्यामुळे पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी बांधलेल्या भीतीवरून गोळी न करता खाली जमिनीवरून करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बाहेरील पोलीस सरावासाठी असताना रायगड पोलिसांचे दोन जण उपस्थित राहावे, टार्गेट ठिकाणचा भराव काढून टाकावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तर तज्ज्ञाकडून मार्गदर्शन घेवून आवश्यक त्या उपाय योजना करण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिली. त्यामुळे नव्या उपाययोजनेनंतर तरी कार्ले गाव गोळी भयमुक्त होणार का हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

Exit mobile version