कारवाईबरोबरच जनजागृती करण्याचा प्रयत्न
| अलिबाग | प्रमोद जाधव |
अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन तरुणाई बिघडण्याचा धोका वाढला आहे. हे संकट मुक्त करण्यासाठी रायगड पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. कारवाई करण्याबरोबरच जनजागृती जिल्ह्यात केली जाणार आहे. अंमली पदार्थ तस्करी, विक्री, व्यापार व उत्पादनावर आळा बसविण्यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
रायगड जिल्हा पर्यटनाबरोबच औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने महत्वाचा ठरत आहे. वेगवेगळ्या भागातून जिल्ह्यातून व राज्य, देशभरातून पर्यटक रायगड जिल्ह्यात येत आहेत. जिल्ह्यात फिरण्यासाठी येत असताना काही पर्यटक गांजा, चरस सारख्या अंमली पदार्थांचा वापर करीत असल्याचे चित्र आहे. काही बंद कारखाने व दुकान व अन्य ठिकाणी चरस, गांजाची विक्री वाहतूक केली जाते. अंमली पदार्थाच्या आहारी जाऊन तरुणाई बघडण्याची भिती निर्माण झाली आहे. रायगड पोलिसांनी आतापर्यंत रोहा, खालापूर, मुरूड अशा अनेक ठिकाणी कारवाई करून अंमली पदार्थ विक्री, वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला आहे. तरीदेखील काही महाभाग गांजाची विक्री करीत आहेत. नशा येणाऱ्या या अंमली पदार्थापासून तरुण पिढी दुर राहवी, यासाठी रायगड पोलिसांनी पावले उचलली आहेत. नशामुक्त रायगडसाठी कारवाई आणि जनजागृतीची मोहिम पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केली जाणार आहे. रायगड पोलीस आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये मनोरुग्ण तज्ञ डॉ. अर्चना सिंग यांची मदत घेतली जाणार आहे. अंमली पदार्थांपासून तरुणाईला दुर ठेवण्यासाठी पोलिसांकडून कारवाईचे पाऊल उचलले जाणार आहे. अंमली पदार्थांची अनाधिकृतपणे तस्करी, साठा, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी 1933 हा मानस हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वीत केला आहे.
घोषवाक्याव्दारे आवाहन
रायगड जिल्ह्यामध्ये रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून हा सण ओळखला जातो. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने बहिणीने भावाला नशा सोडून दिर्घ आयुष्य लाभावे यासाठी बहिण मागते ओवाळणी, नको करू नशेने शरीराची हानी या स्लोगनद्वारे तरुण पिढीला विशेष करून भावांना आवाहन करण्यात येत आहे.
चलचित्राद्वारे होणार जनजागृती
येत्या 27 ऑगस्टला गणरायाच आगमन घरोघरी होणार आहे. जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने हा उत्सव मोठया प्रमाणात साजरा केला जातो. दहा दिवसाच्या कालावधीत बेटी पढाव, प्लास्टीक मुक्ती असे समाज प्रबोधानाचे काम चलचित्रामार्फत केले जातात. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवात गणेशोत्सव मंडळामार्फत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती, व्यसनमुक्तीचे देखावे तयार करून जनजागृती करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात चलचित्राद्वारे जनजागृती केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये तीन हजारहून अधिक शाळा महाविद्यालये आहेत. या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी रायगड पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हा रुग्णालयातील टीम, पोलीस दलातील निर्भया पथक, पोलीस ठाण्यातील पोलीस काका, दीदी यांच्या मदतीने शाळा व महाविद्यालयांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहे. अंमली पदार्थाचे दुष्पपरिणाची माहिती विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातून दिली जाणार आहे.
मानसिक स्वास्थ समस्यांबाबत हेल्पलाईन
नशा येणाऱ्या अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याने तरुण पिढी मानसिक दृष्ट्या खचून जाण्याचा धोका कायमच राहिला आहे. अंमली पदार्थाच्या आहारी गेल्याने काही तरुण आत्महत्या करतात. मानसिक स्वास्थ बिघडण्याची भिती असते.अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या तरुण पिढीचे मानसिक स्वास्थ समस्या सोडविण्यासाठी 14416 हा हेल्पलाईन नंबर कार्यान्वीत केला आहे.
केंद्र व राज्य शासनाने भारत देश नशा मुक्त करण्याचे धोरण अवलंबले आहे. अंमली पदार्थ तस्करी, व्यापार, उत्पादनावर आळा बसावा, यासाठी कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकांनी जिल्हा स्तरावर अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हयात वेगवेगळे उपक्रम राबवून नशामुक्त जिल्हा करण्याचा प्रयत्न राहणार आहे. रायगड पोलीसांसह जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती केली जाणार आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला जाणार आहे. तसेच अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.
आंचल दलाल
पोलीस अधीक्षक, रायगड







