| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील ओरियन मॉल येथे आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याच्या दृष्टीने व्यापक मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. संभाव्य दहशतवादी हल्ला, आग किंवा अन्य आपत्तीजन्य परिस्थितीत समन्वय साधत तत्काळ प्रतिसाद देण्याची क्षमता तपासण्यासाठी ही रंगीत तालीम घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. हे मॉकड्रिल पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने घेण्यात आले. त्यात वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पोलीस निरीक्षक, 8 अंमलदार, बीट मार्शल 1, 2 व 3 वरील अंमलदार, क्यूआरटी पथकाचे 29 अंमलदार, एटीसीचे 2 अंमलदार, सुरक्षा शाखेचा 1 अधिकारी, झोन 3 स्ट्राइकिंग पथकासह 1 अधिकारी व 8 अंमलदार, विशेष शाखेचे 2 अंमलदार तसेच एटीएसचा 1 अंमलदार यांचा सहभाग होता. याशिवाय अग्निशमन दलाचे पथक, ओरियन मॉलचे सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षक आणि रुग्णवाहिकेची टीमही उपस्थित होती. सर्व संबंधित यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय साधत बचावकार्य, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा सराव करण्यात आला. या मॉकड्रीलमुळे आपत्कालीन प्रसंगी यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम होणार असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
ओरियन मॉलमध्ये पोलिसांचे मॉकड्रिल
