। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील पोलीस कर्मचार्यांची इच्छितस्थळी बदली करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेताना पोलीस निरीक्षक रामचंद्र नारायण वारे (वय 58) यांना रंगेहाथ अटक करण्यात आली.
रामचंद्र वारे पनवेल येथील महामार्ग सुरक्षा पथक विभागात कार्यरत आहेत. ही कारवाई पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पोलीस निरीक्षक वारे यांनी पोलीस दलातील आपले सहकारी अधिकारी तसेच कर्मचारी यांची इच्छितस्थळी बदली करण्यासाठी 2 कर्मचार्यांकडून 1 लाख रुपयांची मागणी केली होती. 1 लाख दिल्यानंतर तात्काळ बदली होईल, अशा प्रकारचे आश्वासन वारे यांनी सहकार्यांना दिले होते. त्यानुसार दोन पोलीस कर्मचारी, अधिकार्यांनी 1 लाख रुपयांची जुळवाजुळव केली होती.
दरम्यान, या पोलीस अधिकार्यांनी याबाबतची माहिती पालघर लाचलुचपत विभागाला दिली होती. वारे यांनी पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांना पैसे घेऊन केबिनमध्ये बोलावले होते. याबाबतची माहिती मिळताचा लाचलुचपतच्या पथकाने मंगळवारी सापळा रचून वारे यांना त्यांच्या केबिनमध्ये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.