जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल शहरातील कोळीवाडा परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका आणि मेन मटका जुगाराच्या अड्ड्यावर पनवेल शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत जुगार खेळविणारे दोघे आणि जुगार खेळणारे दोघे अशा एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळावरून 12 हजार 740 रुपयांची रोकड आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.

मंगळवारी (दि. 17) सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोळीवाडा नदीकाठी सार्वजनिक शौचालयासमोरील मोकळ्या जागेत काही जण स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कल्याण मटका आणि मेन मटका जुगार खेळवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत दत्ता शेलार (60) रा. कोळीवाडा, सनी सोनवणे (38) रा. लोखंडी पाडा, अनिल गवांदे (47) रा. करंजाडे आणि शिवा पवार (55) रा. करंजाडे या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 12 हजार 740 रुपये रोख आणि 80 रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोलीस नाईक अनिल चव्हाण, पोलीस शिपाई दत्ता जाधव आणि सचिन कोर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार
"पनवेल शहरात अवैध जुगार, मटका तसेच इतर बेकायदेशीर धंदे चालू दिले जाणार नाहीत. अशा अवैध धंद्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील," असा इशारा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी दिला.
Exit mobile version