लोहारेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

42 जुगारी ताब्यात; 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

| पोलादपूर | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत लोहारे येथील शिवराज बिअर शॉपीच्या मागे सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर अलिबाग पोलीस मुख्यालयाच्या आदेशानुसार शनिवारी दुपारी पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत तब्बल 42 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल आणि 1 लाख 3 हजार 940 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

रायगड जिल्हा परिषदेच्या लोहारे गटातील निवडणूक प्रचारादरम्यान या जुगार अड्ड्याबाबत विधानपरिषदेचे भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी जाहीर सभेत टीका केली होती. मात्र, त्यानंतरही जुगार अड्डा सुरूच असल्याची चर्चा होती. त्यामुळे या कारवाईकडे पोलिसांच्या हालचाली म्हणून पाहिले जात आहे. शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यावेळी माणगाव, लोणेरे, टेमपाले, गारळ, उणेगाव, गोरेगाव, शिरगाव, महाड, पोलादपूर आणि वाडा-कुंभरोशी परिसरातील 42 जण जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या अंगझडतीतून 30 मोबाईल, तीन मोटारसायकली, दोन वॅगनआर कार, प्लास्टिक कॉइन्स, जुगाराचे साहित्य व फर्निचर, तसेच रोकड असा मुद्देमाल जप्त केला.

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या आदेशानुसार व म्हसळा परिमंडळाच्या पोलीस उपअधीक्षक योगिता कुंटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 38 आरोपी प्लास्टिक कॉइन्सच्या माध्यमातून तीन पत्तीचा जुगार खेळताना, तर चार जण जुगारासाठी जागा व साहित्य उपलब्ध करून देताना आढळले. याप्रकरणी पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गणेश विसर्जन मिरवणुकीच्या तयारीत पोलादपूर पोलीस व्यग्र असताना ही कारवाई झाल्याने आरोपींना पोलीस ठाण्यात आणणे आणि गुन्हा दाखल करण्याच्या प्रक्रियेमुळे विसर्जन मिरवणूक तब्बल साडेतीन तास उशिराने सुरू झाली.

Exit mobile version