कामोठे पोलिसांचा हुक्का पार्लरवर छापा

हुक्का पार्लर चालकासह 14 जणांवर कारवाई
पनवेल | वार्ताहर |
कामोठे सेक्टर-19 मधील टुडे-शिवम या इमारतीत बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कामोठे पोलिसांनी छापा मारुन हुक्का ओढण्यासाठी बसलेल्या ग्राहकासह हुक्का पार्लर चालक अशा एकूण 14 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने रेस्टॉरंट, बार व इतर आस्थापना सुरु ठेवण्यासंदर्भात नियम व अटी लागू केलेले असताना सदरचे हुक्का पार्लर बिनदिक्कतपणे सुरु ठेवण्यात आले होते.
कामोठे सेक्टर-19 मधील टुडे शिवम या इमारतीतील शॉप नं. 7 मध्ये मध्यरात्री उशिरापर्यंत बेकायदेशीररीत्या हुक्का पार्लर सुरु असल्याची माहिती कामोठे पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे सहाय्यक पोलीस नाजुकाताई पाटील व त्यांच्या पथकाने कामोठे पोलिसांनी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास सदर हुक्का पार्लरवर छापा मारला. यात पोलिसांनी हुक्का पार्लरचा चालक रोहित हरीलाल सचदेव (27) व हुक्का पार्लरमध्ये काम करणारे चार व्यक्ती तसेच त्याठिकाणी हुक्का ओढण्यासाठी बसलेले नऊ ग्राहक अशा एकूण 14 जणांवर कोरोनाच्या परिस्थितीत नियमांचे उल्लंघन करणे यासह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ जप्त केले आहे.

Exit mobile version