बोगस कॉल सेंटरवर पोलीसांचा छापा

शेकडो अमेरिकन नागरिकांची फसवणूक

| पनवेल | वार्ताहर |

नवीन पनवेल सेक्टर 11 मधील एका रो- हाऊसमध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर खांदेश्वर पोलिसांनी छापा मारुन 16 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी कॉल सेंटर चालवण्यासाठी लागणारे 11 लॅपटॉप, 12 मोबाईल फोनसह अन्य साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांनी सदर कॉल सेंटरचा मालक संदिप हरिश्चंद्र वाल्मिकी (32), मॅनेजर दुशांत चंद्रकांत गोरले (32), तसेच कॉल सेंटरमध्ये काम करणारे अशा एकूण 16 जणांना ताब्यात घेतले आहे. या टोळीने सदर कॉल सेंटरच्या माध्यमातून शेकडो अमेरिकन नागरिकांना लुबाडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या टोळीने ॲमेझॉन (गीक स्कॉड) पेलाल या नावाने अमेरिकेतील नागरिकांना इंटरनेट कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या बँक खात्यामध्ये हॅकिंग ॲक्टिव्हिटी झाल्याची भीती दाखवली. त्यांना सिक्युअर सर्व्हिस देत असल्याचे भासवून त्यांच्याकडून डॉलर स्वरुपात गिफ्ट कार्ड स्विकारल्याचे उघडकीस आले आहे.

खांदेश्वर पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या सुचनेनुसार गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उमेश गवळी, सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर चासकर, फडतरे, पोलिस उपनिरीक्षक पाटील व त्यांच्या पथकाने सदर कॉल सेंटरवर छापा मारला होता. या वेळी सदर रोहाऊसमध्ये 13 व्यक्ती ॲमेझॉन पेलालच्या नावाने बनावट कॉल सेंटर चालवत असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी संगणक व सायबर तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्व लॅपटॉपची तपासणी करून त्यातील सर्व डेटा ताब्यात घेऊन 11 लॅपटॉप, 12 मोबाईल फोनसह इतर साहित्य जप्त केले.

Exit mobile version