पनवेलमध्ये डान्सबारवर पोलिसांची धाड

। पनवेल । वार्ताहर ।

पुणे येथील अपघात प्रकरणानंतर सर्वत्र लेडीज सर्व्हीसबारची झाडाझडती घेण्याचे काम पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू झाले आहे. परंतु अनेक दिवस उलटले तरी पनवेलमधील ऑक्रेस्ट्रा बारच्या नावाखाली डान्सबार चालविणार्‍यांकडे सरकारी यंत्रणेने लक्ष्य केंद्रीत केले नव्हते. समाजमाध्यमांवर काहींनी सरकारी अधिकार्‍यांच्या कार्यतत्परतेवर प्रश्‍न उपस्थित केल्यावर खांदेश्‍वर पोलिसांनी गुरुवारी आसूडगाव येथील इंटरनेट या लेडीज सर्व्हीस बारवर मध्यरात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास धाड टाकून 12 महिला वेटरांना अश्‍लील चाळे करताना ताब्यात घेतले. एकाच बारच्या परवान्याखाली अनेक गैरधंदे येथे चालविले जात असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून केला जात आहे.

पनवेलमधील आसूडगाव परिसरातील सेक्टर 4 ए येथील तपोवन इमारतीमध्ये इंटरनेट नावाचा बार सुरू आहे. यशवंतराव चव्हाण पुणे मुंबई द्रुतगती महामार्गालगत कळंबोली सर्कलच्या हाकेच्या अंतरावर हा बार रात्रभर सुरु असल्याने स्थानिक रहिवाशी वैतागले आहेत. इंटरनेट बारवर यापूर्वी ही नवी मुंबई पोलिसांनी धाड टाकली होती. या बारचे मालक, व्यवस्थापक परवान्यातील अटी पाळत नसल्याचे याअगोदर सुद्धा सिद्ध झाले आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या खास सूचनेनंतर गुरुवारी रात्री स्थानिक पोलीसांनी पुन्हा एकदा बारमध्ये धाड टाकल्यानंतर तेथील महिला वेटर अश्‍लिल चाळे करताना पोलिसांच्या निदर्शनास आले. मागील अनेक दिवसांपासून नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांचे खास पथक या बारवर कारवाई करेल अशी अपेक्षा होती. परंतू गुरुवारची कारवाई अनेक दिवसानंतर झाल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

पनवेलमध्ये लेडीज सर्व्हीस बारची संख्या कमी आहे. मात्र मुंबई पुणे द्रुतगती महामार्गालगत आणि अटलसेतू पासून काही अंतरावर कोन गावाजवळ अनेक लेडीज सर्व्हीस बार एकाच ठिकाणी आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष स्थानिक पोलिसांचा या बारसंस्कृतीला आशीर्वाद मिळत आहे. मागील अनेक वर्षे याच लेडीज सर्व्हीसबार संस्कृतीमुळे पनवेल बदनाम झाले आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त भारंबे यांच्या कारकिर्दीत परवाने धारक लेडीज सर्व्हीस बारमध्ये सुरू असणारे डान्सबार, कुंटणखाने बंद होतील अशी अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. रायगड जिल्हाधिकार्‍यांनी पुणे येथील अपघात प्रकरणानंतर पनवेलच्या डान्सबारमधील झाडाझडती घेण्याचे धाडस न दाखविल्याने पनवेलमध्ये ‘ सर्व काही चालते’, याच पायंड्याने सरकारी अधिकार्‍यांच्या स्तरावर यंत्रणेचा कारभार सुरू असल्याचे दिसले.

Exit mobile version