वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस सज्ज

खासगी संस्थाची घेणार मदत

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

शनिवारपासून सलग चार दिवस सुट्टी आहे. या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता आहे. याच कालावधीत होळीचा सण असल्याने चाकरमानी देखील येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांसोबत पोलीस ठाण्यातील कर्मचारी, होमगार्ड व खासगी संस्थाची मदत घेऊन कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी दिली आहे.

शनिवार व रविवारी साप्ताहीक सुट्टी असून सोमवारी (दि.2) होळी आणि मंगळवारी (दि.3) धुलीवंदन आहे. त्यामुळे शनिवारपासून मंगळवारपर्यंत शासकीय कार्यालयांसह शाळांना सुट्टी आहे. या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रायगड जिल्ह्यात येण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह अलिबाग-पेण, अलिबाग-रेवदंडा व अलिबाग-रोहा मार्गावर चाकरमान्यांसह पर्यटकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, वाहतुक कोंडीत न अडकता त्यांचा प्रवास आरामदायी व चांगला व्हावा, यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने नियोजन केले आहे.

यावेळी जिल्हा वाहतूक शाखेच्या 90 पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच, त्यांच्याकडून 100 होमगार्डची देखील मदत घेतली जाणार आहे. वॉकी टॉकीसह अन्य साधन सामुग्रीच्या मदतीने वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाणार आहे. त्याचे नियोजन जिल्हा वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. मुरूडकडे जाणाऱ्या पर्यटकांसह चाकरमान्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे. जेणेकडून रोहा मार्गावर वाहतूक कोंडीचा भार पडणार नाही, याकडे लक्ष दिले जाणार आहे. पर्यटकांसह नागरिक, व चाकरमानी यांनीदेखील सहकार्य करावे. नियमांचे पालन करून वाहने चालविण्या यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण यांनी केले आहे.

Exit mobile version