| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात गेल्या दोन वर्षांत जवळपास 35 हजार पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे. साधारण साडेसात हजार पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदे रिक्त आहेत.
राज्यात 2022 व 2023 मध्ये मोठ्या पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. कोरोना काळात सुमारे तीन वर्षे राज्य पोलीस दलात भरती झाली नाही. त्यात वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी तुलनेत पोलीस संख्याबळ कमी आहे. गेल्या दोन वर्षांत अनुक्रमे 18 हजार व 17 हजार पदांची मोठी पोलीस भरती राज्यात झाली. परंतु त्या तुलनेने आणखी सात ते आठ हजार पोलीस संख्याबळ मिळणे अपेक्षित असल्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा साडेसात हजार पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, लवकरात लवकर सध्याची 14 हजार 471 पदांची पोलीस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्हा अधिकार्यांना दिले होते. आतापर्यंत 25 जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई व पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत भरती पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात मुंबई पोलिसांना मैदाने न मिळाल्यामुळे त्यांची भरती प्रक्रिया थोडी उशीराने सुरू झाली होती. परंतु ती ही लवकरात लवकर संपवण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात नवीन पोलिस भरतीला सुरुवात होणार आहे.