आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रुट मार्च

| तळा | वार्ताहर |

आगामी रक्षाबंधन, गोपाळकाला व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तळा पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला. सणांमध्ये शहरात नागरिकांकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या आदेशानुसार हा रूट मार्च काढण्यात आला. शहरातील बळीचा नाका, नगरपंचायत नाका, वरचा मोहल्ला, मुळे नाका, मेठ मोहल्ला, आसावरी नाका आदी ठिकाणी हा रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन पोंदकुळे, माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, तळा पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांसह आरसिपी प्लाटूनचे 31 व तळा पोलीस ठाण्याचे 12 कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी तळा शहरवासियांनी येणारे सण हे शांततेत व जातीय सलोखा राखून साजरे करावे, तसेच सण साजरा करीत असताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही व सणाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच कोणीही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन तळा पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांनी नागरिकांना केले.

Exit mobile version