आदिवासी समाजाला प्रगतीवर आणण्याचे उद्दिष्ट; पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांचा प्रयत्न
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याचा जीडीपी राज्यात अव्वल आहे; मात्र, आपला आदिवासी समाज खुप मागे आहे. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील आदिवासी समाजाला प्रगतीवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून भरोसा सेल सुरू केले आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी जाहीर केले. कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कर्जत तालुक्यातील माणगाव वाडी येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या संकल्पनेतून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व करियर मार्गदर्शन तसेच बालविवाह अंधश्रद्धा निर्मूलन बद्दल जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी कर्जत तालुक्यातील माणगाव वाडी शासकीय आश्रमशाळा, चाफेवाडी शासकीय आदिवासी आश्रमशाळा आणि पाथरज शासकीय आश्रमशाळा मधील विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी यशस्विनी गलांडे, पोलीस उप अधीक्षक राहुल गायकवाड, जिल्हा भरोसा सेल समन्वयक स्मिता पाटील, नेरळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे, माथेरानच्या प्रभारी पोलीस अधिकारी सरिता मुसळे आदींसह माणगाव वाडी आदिवासी आश्रमशाळा संचालक माधव गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, कर्जत तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरोसा उपक्रमचे तिसरे पुष्प या सेशनसाठी निमंत्रित केले. त्या पुढे म्हणाल्या की, राज्यात रायगड जिल्हा आर्थिक स्तरावर अव्वल आहे. मात्र, आदिवासी समाज प्रगतीवर पोहचला नाही. त्यासाठी माझ्याकडून हा वेगळा उपक्रम राबवित आहोत. आदिवासी भागात प्रामुख्याने कमी वय असताना लग्न होते. तसेच, लग्नाआधी गरोदर राहण्याचे प्रमाण देखील आहे. त्याचबरोबर पालकांमध्ये व्यसनाचे प्रमाण देखील अधिक आहे. त्यात सर्व सुधारणा व्हावी, तसेच आदिवासी समाजातील मुले कुठेही कमी पडू नयेत, त्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे, असे आंचल दलाल यांनी सांगितले.
भरोसा सेलकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रेरणा उपक्रमात आता मेडिकल कॅम्प देखील असणार आहे. दर आठवड्याला आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर ही योजना राबविली जाईल. तसेच, प्रेरणा कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी राबविला जात आहे त्या त्या ठिकाणच्या आदिवासी वाडीत जाऊन महिलांचे समुपदेशन करण्यास सुरुवात केली आहे.वाडीमधील अनेक प्रश्न समजून घेत तेथील जनतेतील मद्यपान बंद करण्यावर आमचा भर आहे.
आंचल दलाल,
पोलीस अधीक्षक, रायगड जिल्हा







