| पनवेल | वार्ताहर |
ख्रिसमसपासून ते 31 डिसेंबरपर्यंत नववर्षाच्या स्वागतासाठी नागरिक हॉलिडेमध्ये असल्यामुळे दररोज विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाटर्यांचे आयोजन केले जाते. त्यात रेव्ह पार्ट्यादेखील छुप्या पध्दतीने आयोजित केल्या जातात. या रेव्ह पाटर्यांमध्ये अंमली पदार्थांचे सर्रासपणे सेवन केले जाते. तसेच मद्यपींचा धुडगुसही मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे ‘थर्टीफर्स्ट’पर्यंत शहरात वुठलीही अनुचित आणि अप्रिय घटना घडू नये, कायदासुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पनवेल परिमंडळ 2 मधील अधिकारी व कर्मचार्यांची अशा पाटर्यांच्या आयोजनावर करडी नजर असल्याने अशा प्रकारचे पार्ट्या आयोजन करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
ख्रिसमस शांततेत पार पडल्यानंतर आता नववर्ष स्वागतासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक बंदोबस्तासाठी परिमंडळ 2 मधील पोलिसांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. ख्रिसमसपासून ‘थर्टीफर्स्ट’पर्यंत दररोज ठिकठिकाणी पाटर्यांचे आयोजन केले जात असून अनेक पाटर्यांमध्ये अंमली पदार्थाचा वापर होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अंमली पदार्थ पुरविणार्या तस्करांची माहिती काढण्यासाठी पोलिसांचे खबर्यांचे नेटवर्कदेखील कामाला लागले आहे. पनवेल परिसरातील हॉटेल्स, धाबे, कॉटेजेस, फार्म हाऊस, जंगल परिसरातील पाटर्यांची ठिकाणे, खाडी किनारपट्टीची ठिकाणे येथे अनुचित प्रकार अथवा गैरकृत्य होणार नाही, याकडे पोलिसांकडून लक्ष दिले जात आहे. त्यातही विशेष करुन चोरीछुपे आयोजित केल्या जाणार्या रेव्ह पाटर्यांवर पोलिसांची करडी नजर असते.







