पाण्यातून येताहेत अळ्या; नागरिकांचे आरोग्य धोक्यात
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ ग्रामपंचायत हद्दीत खांडा गावात नळाद्वारे येणारे पाणी यामधून दूषित पाणी येत आहे. त्याचवेळी त्या दूषित पाण्यातून अळ्या येत असल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर नेरळ ग्रामपंचायतीकडून खांडा गावात जाणारी जलवाहिनी जमिनीबाहेर काढून दूषित पाणी कुठून जाते याचा शोध सुरू केला आहे. ग्रामस्थांचा या अशुद्ध आणि दूषित पाण्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नेरळ ग्रामपंचायतीमधील खांडा गावातील भागात मोहाची वाडी येथे असलेल्या नेरळ नळपाणी योजनेच्या मुख्य जलकुंभामधून पाणीपुरवठा होतो. या जलकुंभापासून खांडा गाव हे अवघ्या 500 मीटर अंतरावर असून, गेले काही दिवस खांडा गावातील काही भागात अशुद्ध पाणी येत असल्याची तक्रार ग्रामस्थ करीत होते. खांडा गावात साधारण 500 घरांची वस्ती असून, काही व्यावसायिकदेखील असल्याने पाण्याची गरज जास्त असते. त्यात मुख्य जलकुंभाजवळ हे गाव असल्याने खांडा गावातील ग्रामस्थ यांच्याकडे चांगला पाणीपुरवठा होत असतो. गेली कित्येक दिवस नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील खांडा विभागामध्ये दूषित पाणी येत आहे. पाण्यासोबत जंतू आणि पाण्याला दुर्गंधी येत असून, नळावाटे येणारे हे पाणी कसे प्यायचे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ग्रामपंचायत आरोग्याशी खेळत आहे, असे आरोप स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत. स्थानिक ग्रामस्थ मनोहर हजारे यांनी तीन दिवसांपूर्वी नेरळ ग्रामपंचायतीमध्ये जाऊन खांडा गावातील समस्या मांडली असता प्रशासक सुजित धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी अरुण कारले यांनी तात्काळ उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले.
त्यानंतर आज सकाळपासून नेरळ ग्रामपंचायत पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचार्यांनी खांडा गावातील जलवाहिनी खोलली आहे. जमिनीमध्ये असलेली जलवाहिनी बाहेर काढून कोणत्या ठिकाणी गटाराचे सांडपाणी पाण्यात मिसळते आहे काय? याची खात्री करण्यास सुरुवात केली आहे. तर, नेरळ ग्रामपंचायतीमधील सर्व भागाला ज्या मुख्य जलकुंभामधून पाणीपुरवठा होतो, तेथून अगदी जवळ असलेल्या खाडा भागात नळाद्वारे दूषित पाणी कसे जात आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्या दूषित पाण्याला विशेष दुर्गंधी येत असून, पाण्यात अळ्यादेखील येत असल्याने ग्रामस्थ संतप्त आहेत. याबाबत स्थानिक ग्रामस्थ मनोहर हजारे यांनी पाणीप्रश्नावर आम्हाला गेली कित्येक दिवस पिण्यायोग्य पाणी येत नाही. पाण्यामध्ये जंतू असतात आणि पाण्याला दुर्गंधी येत असून, आम्ही नेरळ ग्रामपंचायत कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
आरोग्य विभागाने घेतली दखल
खांडा गावातील ग्रामस्थांच्या मागणीची दखल नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे घेतली आहे. ग्रामपंचायतीकडून तेथे जाऊन पाणी तपासले असून, पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे सर्व नमुने अलिबाग येथे असलेल्या प्रयोगशाळेत पाठवले असल्याने ग्रामस्थ कोणत्या प्रकारचे पाणी पितात याचा निर्णय होणार आहे.