। उरण । वार्ताहर ।
उरण रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातातील आरोपी जय चंद्रहास घरत रेगणार हॉस्पिटल सेक्टर 23, उलवे येथील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्याला अद्याप अटक करण्यात आली, नसल्याची माहिती उरणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली. यावरून आरोपी जय घरत यास वाचविण्यासाठी राजकीय यंत्रणेचा दबाव सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
उरण शहरातील रेल्वे स्थानकात समोर शनिवारी (दि.6) रात्री 11 वाजता क्रेटा चारचाकी चालकाने भरधाव वेगात स्कुटरला धडक दिल्याने पती, पत्नीचा मृत्यू तर तीन वर्षांची चिमुरडी जबर जखमी होण्याची दुर्दैवी घटना घडली. चारचाकी गाडीचा चालक चरस, गांजा सारख्या पदार्थांचे सेवन करून नशेत असल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगतात. या घटनेनंतर चालकांनी रेल्वे पोलिसांशी अरेरावीकरून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली. काही व्हिडीओ व्हायरल झाले. त्यामध्ये घटनास्थळी पोलीस व वाहतूक पोलीस दाखल असतानाही आरोपी चालक जय चंद्रहास घरत हा पळून जाण्यात कसा यशस्वी झाला अशी चर्चा सुरू आहे. याचा गाजावाजा होऊनही आजतागायत पोलीस आरोपी जय घरत यास अटक करू शकले नाही.
अपघातानंतर दोन दिवसांनी झालेल्या दुर्दैवी घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये वाहतुक पोलीस व उरण पोलीस वर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यावेळी आरोपी चालक जय चंद्रहास घरत हा ही तिथे असल्याचे व्हिडीओमध्ये सरळसरळ दिसत आहे. मग आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालाच कसा असा संशय निर्माण होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चालक जयचे वडील हे आमदार महेश बालदी यांच्या मर्जीतील असल्याने आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे बोलले जाते.
आरोपी जर जखमी असेल तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन दवाखान्यात दाखल करणे आवश्यक असताना परस्पर त्याचे मित्र किंवा इतर जण कसे काय घेऊन जाऊ शकतात. तरी व्हिडीओमध्ये जे त्याच्याबरोबर दिसतात त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे. त्यामुळे यापुढे इतरांना वचक बसेल अशी चर्चा सुरू आहे. नशा करणार्या पदार्थांचा अंश पोटामध्ये काही तास असतो. तो उघड होऊ नये म्हणून तर त्याला पळविण्यात आले नाही ना. तो नॉर्मल झाल्यानंतर आरोपीस अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी उरणच्या जनतेकडून जोर धरू लागली आहे.
अपघातानंतर पोलिसांनी फरार आरोपीला पकडण्यासाठी दोन पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले आहे. परंतु शनिवार दि. (दि.6) एप्रिल रोजी अपघात घडल्यानंतर आज 8 दिवस उलटूनही आरोपीस अटक करण्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी आरोपी जय चंद्रहास घरत यास अटक केली नसून त्याच्यावर रेगणार हॉस्पिटल सेक्टर 23, उलवे येथील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार असल्याची माहिती दिली. मात्र अजूनही आरोपीस अटक केली जात नसल्याने आरोपीस वाचविण्यासाठी हा सर्व अट्टहास सुरू असल्याची चर्चा उरणच्या नाक्यांनाक्यावर दबक्या आवाजात सुरू आहे. आरोपी जय घरत यास अटक दाखवून त्यास जामिनावर सुटका करण्यासाठी किंवा अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी सर्व बाजूनी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.
एवढी मोठी दुर्घटना होऊनही कोणा राजकीय पक्षांनी अथवा नेतेमडळींनी याबाबत दुःख व्यक्त केले नाही. ही घटना घडल्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी लोकसभा उमेदवार श्रीरंग बारणे यांची प्रचार सभा जेएनपीटी येथे संपन्न झाली. त्याठिकाणी कोणताही शोक व्यक्त करण्यात आला नाही. आज आठ दिवस उलटून ही कोणताही राजकीय नेता अथवा लोकसभा उमेदवार यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट अथवा साधी विचारपूस ही केलेली नसल्याने उरणच्या जनतेत संतापाची लाट पसरली आहे.
