सावंतवाडीत राजकीय ‘संशयकल्लोळ’

। सावंतवाडी । वृत्तसंस्था ।

सावंतवाडी येथील महाविकास आघाडी व महायुतीमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे कोणाची मते कोण पळवणार, याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. काही पदाधिकारी अंतर्गत बंडखोरांचे काम करत असल्याच्या छुप्या चर्चांमुळे अंतर्गत संशयकल्लोळ सुरू आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये मागच्या तीन टर्मचा विचार करता दीपक केसरकर व राजन तेली या दोन चेहर्‍यांव्यतिरिक्त यावेळी विशाल परब आणि अर्चना घारे हे दोन नवीन चेहरे घराघरांत पोहोचले आहेत. अर्चना घारे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून, तर विशाल परब यांनी भाजपचे काम या मतदारसंघात केले आहे.

याच्याच जोरावरच विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपामध्ये दोघांचीही पक्षाकडून निराशा झाली. पक्षाने निराश केले तरी स्वतः केलेल्या कामाच्या जोरावर या दोघांनी निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारी अर्ज भरून केसरकर आणि तेली यांच्यासमोर काहीसे आव्हान निर्माण केले आहे. परब व घारे या निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत. आता दोघांकडून प्रचाराची रणनीतीही आखली जात आहे.

मतदारसंघाची सद्य:स्थिती पाहता चारही उमेदवारांमध्ये मत विभागणी होणार आहे. महायुतीमध्ये भाजपची मते छुप्या पद्धतीने विशाल परब यांच्याकडे वळण्याच्या शक्यतेची चर्चा सुरू आहे. काही भाजपमधल्या पदाधिकार्‍यांनी परब यांचे काम सुरू केले आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी परब यांच्या निलंबनाबरोबरच संबंधित पदाधिकार्‍यांना अल्टिमेटम दिला आहे. केसरकर यांच्यावर असलेली भाजपमधील लोकांची नाराजी यामागचे मूळ कारण आहे. ही नाराजी दूर करणे भाजपमधील नेत्यांसमोर आव्हान आहे.

केसरकर यांनीही आपल्या आजपर्यंतच्या राजकीय अनुभवाचा वापर करून ही मते आपल्याकडे वळवल्यास त्यांना याचा निश्‍चितच फायदा होईल. दुसरीकडे तेली हे गेले कित्येक वर्षे भाजपमध्ये कार्यरत असल्याने भाजपमधील काही लोकांमध्ये त्यांचा असलेला थेट संपर्क तेलींच्या पथ्यावर पडणार आहे. भाजपची ही मते तेलींकडे वळण्याची शक्यता आहे. अर्थात ही मते वळवण्यासाठी स्थानिक पातळीवरील पदाधिकार्‍यांची गरजही या दोघांना लागणार आहे. त्यामुळे काही नेते छुप्या पद्धतीने अपक्षांचे काम करत असल्याची चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीतही वेगळी परिस्थिती नाही. अर्चना घारे यांनी राष्ट्रवादीच्या उभारणीबरोबरच गावागावात महिलावर्ग तसेच थेट ग्रामस्थांच्या घराघरांत जाऊन संपर्क, आपुलकी निर्माण केली आहे.

मात्र, त्यांना पडणारी मते राष्ट्रवादी म्हणून तयार केलेली असण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास महाविकास आघाडीचा तोटा होणार आहे. एकूणच दोन्हीकडे या सगळ्यातून राजकीय संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. बंडखोरी थोपवण्याचे प्रयत्न दोन्ही गटांकडून सुरू आहेत.

Exit mobile version