। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान शहरातील वीज प्रश्न गेली वर्षभर चर्चेत आहे. शहरातील वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी माथेरान मध्ये अनेक उपोषण झाली आहेत. मात्र, तरीदेखील अनेक प्रकरणे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. तर, काही प्रकरणे मंजूर होऊन ही निधीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे माथेरानचा वीज प्रश्न सुटण्यासाठी राजकीय इच्छशक्तीची गरज जाणवत आहे.
माथेरानमधील भौगोलिक परिस्थिती पाहता अरुंद वळण व तीव्र चढाचा घाट, डोंगर दरी, घनदाट जंगल असल्यामुळे पावसाळ्यात विद्युत वाहिनीवर झाडे कोसळणे, कंडक्टर तुटणे, पोल पडणे, इन्सुलेटर फुटणे, माकडे, पक्षी हे वाहिन्यांना चिकटल्याने विद्युत पुरवठा खंडित होणे, अशा घटना घडत असतात. त्यात घनदाट झाडी, डोंगर दरीतून लाईन पेट्रोलिंग करणे अतिशय अवघड असुन वाहतुकीचे साधन तसेच भ्रमणध्वनीचे नेटवर्कही उपलब्ध नसल्याने वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी विलंब होऊ शकतो. गतवर्षी कर्जत येथे वीज बचाव समितीच्या उपोषणाच्या वेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता यांनी नेरळ ते माथेरान दरम्यान भूमिगत वीज टाकण्यासाठी प्रस्ताव शासनाला सादर करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाला वर्ष पूर्ण झाले असून त्या प्रस्तावाबाबत महावितरण कडून काहीही माहिती मिळत नाही. त्यामुळे येथील प्रलंबीत कामे पूर्ण करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कामी पडत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.