ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई; आंबिवलीच्या महिला आक्रमक
| पेण | प्रतिनिधी |
आंबिवली ग्रामपंचायतीमधील भाजपचे उपसरपंच जगदीश पाटील यांच्या मनमानीला कंटाळून माजी सरपंच नेहा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंबिवली गावच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. धो-धो पाऊस पडत असतानादेखील आंबिवली गावामध्ये अनियमितपणे पाणीपुरवठा केला जातो. भाजपाकडून होत असलेल्या राजकारणामुळे ऐन पावसाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे, असा आरोप नेहा पाटील यांनी केला आहे.
माजी सरपंच नेहा प्रशांत पाटील यांच्या कारकीर्दीमध्ये आंबिवली ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. त्या योजनेंतर्गत आंबिवली ग्रामस्थांना हर घर नळ नेण्यासाठी पैशांचा भुर्दंड पडू नये म्हणून 14 व्या वित्त आयोगांतर्गत तीन लाखांची तरतूद करून हर घर नळ पोहोचवले होते. त्यावेळी कधीही गावातील महिलांना पाण्याची समस्या आली नाही. कारण, तत्कालीन सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी स्वतःच्या गावासाठी पाण्याची व्यवस्था विहिरीत स्त्रोत उत्पन्न करून केली होती. या विहिरीला पाणी बारामही असल्याने कधीच पाणीटंचाई जाणवली नाही. परंतु, स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी उपसरपंच जगदीश पाटील यांनी व्यवस्थित सुरू असणारी जलजीवन योजना बंद आहे असे दाखवून नव्याने पाणी योजना जिते येथून पाईप जोडून सुरू केली. परंतु, ती योजना पूर्णतः चुकीच्या पद्धतीने राबवल्यामुळे आता आंबिवली गावात योग्य प्रकारे पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे महिलांचे हाल होत असल्याने त्या आक्रमक झाल्या आहेत. त्यातच उपसरपंच जगदीश पाटील हे आंबिवली गावात राहात नसल्याने त्यांना आंबिवली गावातील आयाबहिणींची व्यथा समजत नाही, असेही आक्रमक झालेल्या महिलांचे म्हणणे आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रशांत पाटील, वासुदेव पाटील, गणेश पाटील, धनाजी पाटील, दिपक पाटील, रोशन पाटील, सोनाली पाटील, सुवर्णा घरत तसेच मोठ्याा प्रमाणात महिला व ग्रामस्थ हजर होते.
पाण्यासाठी राजकारण करू नये : - मा.सरपंच नेहा पाटील
आम्ही गावासाठी काही तरी करतो हे दाखविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे योग्य प्रकारे सुरू असलेली माझ्या काळातील पाणी योजना बंद करून नवीन पाणी योजना सुरू केली आहे. माझ्या कारकीर्दीत 14 व्या वित्त आयोगातून तीन लाखांची तरतूद हर घर नळासाठी केली होती. असे असताना आज सर्वसामान्यांकडून एक हजार रूपये का वसूल केले जात आहे. तसेच दरमहा पाण्याच्या नावाने ग्रामपंचायत 200 रुपये वसूल करत आहे. या गावात मोलमजुरी करणारे अनेक ग्रामस्थ आहे. त्यांनी हे पैसे काठून आणायचे? तसेच 15 ऑगस्ट रोजी पाण्यासंदर्भात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, ग्रामसभेत गदारोळ होईल हे समजताच सत्ताधार्यांनी 15 ऑगस्टची ग्रामसभा 14 ऑगस्टलाच उरकली. त्यामुळे आम्ही सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्याविरूद्ध तक्रार केली असून, त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी, अशी पुन्हा एकदा मागणी करत आहोत. उपसरपंच जगदीश पाटील हे आपली मनमानी करून गावात पाण्याचे राजकारण करत आहेत. हे आम्ही कधीही खपून घेणार नाही, असे माजी सरपंच नेहा पाटील यांनी सांगितले.