शेकापक्षाची भुमिका महत्वपुर्ण ठरणार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, माणगाव, तळा, म्हसळा, पाली आणि खालापूर या सहा नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबरला मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 19 डिसेंबरला प्रचाराची सांगता झाली असून आता छुपा प्रचार सुरू झाला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडी सरकार असले तरी जिल्ह्यात सहाही नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष वेगवेगळे लढत आहेत. खालापूरमध्ये शेकापक्ष स्वबळावर लढत असून इतर ठिकाणी देखील शेतकरी कामगार पक्षाची भुमिका महत्वाची ठरणार आहे. भाजप आणि मनसे हे स्वबळावर आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी एकमेकांवर झाडल्यानंतर आता प्रचार थांबला आहे. त्यामुळे 21 डिसेंबरला मतदार राजा आता कोणाला कौल देणार याचे चित्र 19 जानेवारीला स्पष्ट होणार आहे.
रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया 21 डिसेंबरला होत आहे. जिल्ह्यात शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे हे प्रमुख पक्ष आहेत. राज्यात आघाडी सरकार असल्याने वरिष्ठ पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्रित लढण्याबाबत बोलले जात होते. मात्र जिल्ह्यात असे चित्र पाहण्यास मिळालेले नाही. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पाली, माणगाव, तळा, म्हसळा, खालापूर, माणगावमध्ये सोयीनुसार काँग्रेस आणि इतर पक्षासोबत आघाडी तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवीत आहे.
21 डिसेंबरला होणार्या मतदानवेळी आता मतदार राजा हा कोणाला कौल देणार हे 19 जानेवारी रोजी कळणार आहे.तर मतदान 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत असेल. 22 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.







