प्रशासनाचे नागरीकांच्या जिवाशी खेळ
। नवीन पनवेल । वार्ताहर ।
तळोजा औद्योगिक विभागातील कारखान्यातून सोडण्यात आलेल्या विघातक विषारी पाण्याने कासाडी नदीला लाल रंग आला आहे. या बेसुमार वाढत्या विघातक प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांचे जीवनच उध्वस्त झाले आहे. त्यांना अनेक आजारांना सामना करावा लगत आहे. या विषारी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका होईल का, की प्रशासन स्थानिकांचा जीव घेण्यावर बसले आहे, असा संतप्त सवाल काँग्रेसचे पनवेल जिल्हा पर्यावरण अध्यक्ष सुरेश पाटील यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केला आहे.
तळोजा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तळोजा औद्योगिक विकास मंडळाकडे गेल्यापासून कासाडी नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी बेलापूर व तळोजा औद्योगिक विकास मंडळ यांच्यामधून विस्तव जात नसल्याने याची किंमत येथील स्थानिक नागरिकांना मोजावी लागत आहे. प्रदूषण करणार्या कारखान्याकडून दोन्ही आस्थापना हप्ते वसूल करत असल्याने येथील प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्री कारखान्यातून विघातक पाणी सोडण्यात येत आहे. दीपक कंपनी ते वलप गणेशनगर विसर्जन घाट दरम्यानच्या कासाडी नदीचे पाणी लालच लाल झाले आहे. याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी मुंबई व तळोजा औद्योगिक विकास मंडळ यांना देण्यात आली असता कासाडी नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई न करता येथे आर्थिक हितसंबंध जपले गेले. त्यामुळे येथील कंपन्यांना कासाडी नदीत विषारी पाणी सोडण्याची मुभा देण्यात आली.
आज कासाडी नदीचे प्रदुषीत पाणी जमिनीत मुरले जाऊन नागरिकांच्या पिण्यात येऊन त्यांना आस्थमा, छातीत जळजळ, फुफुसाचे आजार जडले आहेत. तर, लहान मुलांची वाढ खुंटत असून अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व तळोजा औद्योगिक विकास मंडळाकडून न्यायालयाचे आवमान करताना तळोजे औद्योगिक वसाहतीमध्ये सर्रासपणे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच कासाडी नदीत, मोकळ्या भुखंडावर ओतले जात असताना तळोजे पोलिसांपासून प्रदुषण नियंत्रक मंडळ, एमआयडीसी, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पनवेल महापालिका प्रशासन डोळ्यावर कातडे ओढून मांजरीसारखे गप्प बसले आहे.
तळोजा सांडपाणी प्रकल्पाला वाहून आणणार्या वाहिन्या दिशाहीन व्यवस्थापनामुळे टाकण्यात आल्याने त्या जागोजागी फुटल्या आहेत. या वाहिन्यांचे चेंबर भरल्याने कारखान्यातील विघातक पाणी थेट कासाडी नदीत जात आहे. नवीन टाकलेल्या वाहिन्या आणि त्याचे भरलेले चेंबर साफ करण्यासाठी एमआयडीसीने भागीदारीत ठेकेदार नेमल्याने त्यावर दर महिन्याला लाखो रुपये खर्च केला जात आहे, असा गंभीर आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे. तसेच, तळोजा औद्योगिक नगरीत प्रदुषणाचा महाराक्षस पोसणार्या अधिकार्यांनाही राज्य शासनाने जबाबदार ठरवून त्यांना सहआरोपी का केले जात नाही, असा ही प्रश्न सुरेश पाटील यांनी केला आहे.