पोलादपूरमध्ये टँकरने दूषित पाणीपुरवठा

| पोलादपूर | प्रतिनिधी |
नगरपंचायत पोलादपूरकडून गेल्या काही दिवसांपासून जयहनुमाननगर भागातील रहिवाशांना गढूळ तसेच अस्वच्छ पाणीपुरवठा होत असून अलिकडेच टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना प्रमाणाबाहेर जलशुध्दीकरणाचे द्रव टाकल्यामुळे पाण्याला उग्र वासही येऊ लागला असल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. याप्रकरणी पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधी गटनेते दिलीप भागवत यांनी सत्ताधारी नगरसेवकांना टँकरद्वारे उपलब्ध होणारे पाणी पिण्याचे आवाहन करून शुध्द पाणी मिळेपर्यंत जयहनुमाननगरच्या ग्रामस्थांसोबत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

जुन्या नळपाणीपुरवठा योजनेची जॅकवेल गेल्या वर्षी अतिवृष्टीदरम्यान वाहून गेल्यानंतर आजमितीस त्याजागी दुसरी जॅकवेल उभारण्यात आली नसल्याने नवीन विस्तारीत नळपाणीयोजनेच्या पाईपलाईनमधून पाणीपुरवठा पोलादपूर शहरामध्ये केला जात असतो. मात्र, चौपदरीकरणाच्या कामादरम्यान प्रभातनगर भागामध्ये पाणी तुंबल्यानंतर ते काढण्यासाठी नवीन विस्तारीत नळपाणीयोजनेच्या पाईपलाईनचे जेसीबीमुळे नुकसान झाले असल्याने हा विस्तारित पाणीपुरवठयाचा प्रश्‍न अधिकच बिकट झाला आहे. पोलादपूर शहरातील हनुमाननगर ही कष्टकरी जनतेची वसाहत असून याठिकाणी काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा करण्यात आल्याने सुमारे 10-15 आबालवृध्दांना आरोग्याच्या समस्या उदभवल्याने उपचारासाठी रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असल्याची माहिती स्थानिकांनी यावेळी दिली.

याप्रसंगी स्थानिक नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आलेले नगरपंचायतीमधील विरोधी गटनेते दिलीप भागवत आणि नगरसेवक निखिल कापडेकर यांनी नगरपंचायतीमार्फत पाठविण्यात आलेल्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना ब्लिचिंग पावडरचे प्रमाण अतिरिक्त ठेवल्याने हे पाणी पिण्यालायक राहिले नसून दुषित पाण्यामध्ये असे ब्लिचिंगपावडर टाकलेले पाणी पिण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकांना आग्रह करून स्थानिक नागरिकांसोबत ठिय्या देण्याचा इशारा यावेळी नगरपंचायतीमधील विरोधी गटनेते दिलीप भागवत यांनी दिला.

Exit mobile version