खासगी बोअरवेलच्या संख्येत वाढ विद्युतबिलेही महागली
| पोलादपूर | प्रतिनिधी |
सावित्री आणि चोळई नद्यांच्या संगमाजवळ वसलेल्या पोलादपूर शहरामध्ये गेल्या 14 वर्षांपासून नळपाणी योजनेच्या असफलतेमुळे घरोघरी खासगी बोअरवेलच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या बोअरवेलमधील पाण्याचा उपसा टेरेसवरील पाण्याच्या टाकीमध्ये पोहोचविण्यासाठी मोटारपंपही सर्वत्र बसविण्यात आल्याने पोलादपूर शहरामध्ये विजेच्या वापरात वाढ झाल्याने बिलापोटी देय रक्कमांतही वाढ झाली आहे. 17 फेब्रुवारी 2009 रोजी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्याहस्ते भूमिपूजन झालेल्या पोलादपूर शहराच्या विस्तारित नळपाणीपुरवठा योजनेची तेव्हापासून आजपर्यंतची अवस्था मनकटीच्या लग्नाला सतराशे विघ्नफ या मराठी म्हणीसारखी आहे. त्यानंतर लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीसह ग्रामपंचायतीच्या आणि पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी दोन निवडणुका झाल्या आहेत. यामुळे पोलादपूर शहराच्या जुन्या नळपाणीपुरवठा योजनेप्रमाणे शहराला अद्याप पाणी पुरवठा नळाद्वारे सुरू झाला नसून शहराच्या विविध भागात अनेक अपार्टमेंटस् आणि खासगी इमारती उभारण्यात आल्याने जमिनीमध्ये बोअरवेल खोदून त्या बोअरवेलवर विद्युत मोटारपंप बसवून किमान तिसर्या ते सातव्या मजल्यावर या बोअरवेलमधील पाणी खेचून पाठवित संपूर्ण इमारतीला पाणीपुरवठा करण्याचे काम केले जात आहे.
पोलादपूर शहराची जुनी नळपाणीपुरवठा योजना दिवसातून दोनवेळा नळाद्वारे पाणी पुरवठा करीत असे. मात्र, या योजनेमधून मुख्य शहरातील जुना महाबळेश्वर रस्ता, गांधी चौक ते महाबळेश्वर रस्ता बाजारपेठ, मठगल्ली, तांबडभुवन, गाडीतळ, सिध्देश्वरआळी, मटणमार्केटजवळील मोहल्ला, शिवाजी नगर, भैरवनाथनगर, आनंदनगर, डॉ.आंबेडकर नगर या लोकवस्त्यांना पाणी मिळताना दोनवेळा साठवण टाकी भरण्यासाठी खुपच अडचणी येऊ लागल्या. यामुळे विस्तारीत नळपाणी योजनेची आवश्यकता तत्कालीन आमदार स्व.माणिक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नांना तत्कालीन राजिप अध्यक्ष पंडीत पाटील यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. या विस्तारीत नळपाणी योजनेच्या प्रत्यक्ष कामामध्ये असंख्य अडथळे निर्माण झाल्याने योजनेतील निर्धारित भागात आणि नियोजित तसेच अपेक्षित पाणीपुरवठयाचे काम आजतागायत सुरू झाले नाही. 2021मध्ये पोलादपूर शहराची जुन्या नळपाणीपुरवठा योजनेची सावित्री आणि चोळई नद्यांच्या संगमावरील जॅकवेल वाहून गेल्यानंतर बांधण्यात आलेल्या जॅकवेलसाठी कोणी निधी उपलब्ध केला याबाबत दावे व प्रतिदावे करण्यात आल्यानंतरही अद्याप नवीन विस्तारित नळपाणी योजनेला कार्यान्वित करण्यासाठी कोणताही प्रयत्न सुरू नसल्याने खासगीरित्या बोअरवेल खणून त्याद्वारे पाणीपुरवठा मिळविणार्या पोलादपूरकरांना जादाची विद्युतबिले अजून किती वर्षे सोसावी लागणार आहेत, हे येणारा काळच ठरवेल, अशी रामभरोसे भुमिका पोलादपूरकर घेत आहेत.