इंधन खर्चात बचत; पर्यावरणाचे संवर्धन
। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
वाढत्या उन्हाळ्यात उन्हाचे चटके आणि वाढत्या महागाईमुळे बसणारे आर्थिक चटके खाऊन सामान्य माणूस अक्षरशः होरपळून निघत आहे. पण हेच उन्हाचे चटके आता सामान्य माणसाला सुखद ठरतील आणि अन्नही फूकट शिजवून देतील. कारण आता रायगड जिल्ह्यात सोलर पॅराबोलिक कुकरचा काही ठिकाणी वापर होताना दिसत आहे.
यासाठी अलिबाग तालुक्यातील चौल गावचे निसर्ग मित्र शैलेश राईलकर हे सोलर पॅराबोलिक कुकर वापरत आहेत. या सोलर पॅराबोलिक कुकरमध्ये अन्न शिजवण्यामुळे इंधन खर्च शून्य झाला आहे. शिवाय पर्यावरण संवर्धनासाठी ही प्रदूषण विरहित सोलर पॅराबोलिक कुकर उपयुक्त ठरत आहे. शैलेश राईलकर हे पारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर कमी व्हावा व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढावा यासाठी प्रचार प्रसार करत आहेत. राईलकर यांच्याकडील सोलर पॅराबोलिक कुकर पाहून अनेक जण अचंबित होत आहेत.
इंधन व गॅस सिलेंडरचे वाढते दर, धान्य, भाज्या व फळांचे वाढते भाव आणि एकूणच वाढत्या महागाईमुळे वाढलेल्या खर्चामुळे सामान्य माणसाचे अक्षरशः कंबरडेच मोडले आहे. मात्र, आता कोणताही इंधन खर्च न करता या सोलर पॅराबोलिक कुकरवर अक्षरशः फुकट रोजचा घरगुती वरणभात तयार होऊ शकतो. भाज्या, कडधान्ये, बटाटे सुद्धा फुकट शिजवले जाऊ शकतात. शैलेश राईलकर यांचा हा नाविन्यपूर्ण प्रयोग यशस्वी ठरत आहेत. अनेकजण याचा लाभ घेत आहेत.
असा आहे सोलर पॅराबोलिक कुकर पावसाळी छत्रीचा आकार असलेली परंतू उलट्या बाजूने ऐल्युमिनियम धातूच्या पातळ पत्र्याच्या पट्ट्यांपासून हा सोलर पॅराबोलिक कुकर बनविलेली आहे. सध्या याची किंमत साधारणपणे 20 ते 22 हजार रुपये आहे. मात्र, हे पैसे लागलीच वसूल होतात. अन्न शिजवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे इंधन न लागल्यामुळे ऊर्जा साधनांवरील खर्च शून्य होतो.
कायकाय शिजते सोलर पॅराबोलिक कुकर दूपारच्या भर उन्हात ठेऊन यामध्ये घरातील प्रेशरकुकर रोजच्या प्रमाणे तयार करून ठेवला असता सुमारे तीन तासात यामधील अन्न शिजते. त्याचप्रमाणे आंघोळीसाठी पाणीही गरम करता येते. भाज्या, कडधान्ये, बटाटे या गोष्टी उत्तम शिजतात
प्रदूषण विरहित व मोफत निसर्गातून फूकट मिळणार्या सौरऊर्जेचा वापर करून यावर अन्न शिजते. पावसाळ्यातील दोन-तीन महिने सोडले तर इतर सर्व महिने चांगला सूर्यप्रकाश मिळतो. त्यामुळे या सोलर पॅराबोलिक कुकरचा वापर नियमित होऊ शकतो. घरगुती वापरा बरोबरच छोटे व्यावसायिक देखील नक्कीच फायदा कमाऊ शकतील.
रायगड जिल्ह्यामध्ये अंगणामध्ये या सोलर पॅराबोलिक कुकरचा वापर होऊ शकतो. याशिवाय इमारतीच्या गच्चीवर देखील वापर करता येईल. पर्यावरण पूरक जीवनशैलीसाठी अशा प्रकारची साधने आवश्यक आहेत. यामुळे पारंपारिक ऊर्जा साधनांचा वापर बंद होऊन अपारंपारिक शाश्वत, प्रदूषण विरहित व एकदाच खर्च होणार्या ऊर्जा साधनांचा अधिक वापर होईल. यासाठी वैयक्तिक स्तरावर ती जनजागृती व प्रसार करत आहे.
शैलेश राईलकर,
पर्यावरण अभ्यासक,
चौल-अलिबाग