भंगाराच्या गोदामातून प्रदुषण

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

| सुकेळी | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे ते कोलाड या दरम्यानच्या अंतरामध्ये अनेक भंगारवाले ठाण मांडुन बसलेले दिसून येत आहेत. नागोठणे, वाकण, सुकेळी, खांब ते कोलाड परिसरामध्ये भंगारवाल्यांचा सुळसुळाट सुरु आहे. महामार्गालगत वाकण-बाळसई-रोहा मार्गावर वाकण पुलानजिक असलेल्या अनाधिकृत भंगाराच्या तसेच खांब येथील एका भंगाराच्या गोदामातून मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या धोक्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या भंगाराच्या गोदामातून मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदुषणाच्या बाबतीत स्थानिक पोलिसांनी कारवाई करण्यात यावी, अशी बातमी काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती. पंरतू अद्यापही याबाबतीत स्थानिक पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे परिसरातील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या भंगारवाल्यांवर कोणाचीही वचक नसल्यामुळे भंगारवाल्यांचे चांगळेच फावत आहे.

वाकण पुलाजवळ अंबा नदीच्या किनारी असलेल्या एका भंगाराच्या गोदामाजवळ मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या वस्तू, केबल अशा प्रकारच्या अनेक भंगारातील वस्तू जाळण्यात येतात. त्यामुळे अक्षरशः धुराचे लोटच्या लोट निघत असल्यामुळे सर्वच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदुषण दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यातच भंगाराचे गोदाम हे अंबा नदीच्या किनारी आहे. या भंगाराच्या गोदामाजवळूनच अंबा नदी वाहत आहे. या नदीच्या पाण्याचा वापर येथील नागरीक करीत असतात. तसेच या नदीतील पाणी पिण्यासाठी गुरांसाठी वापरतात. त्यामुळे हे पाणी दुषित होऊन नागरिक व गुरे-ढोरे यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Exit mobile version