। पनवेल । वार्ताहर ।
खारघर, सेक्टर 20 शिल्प चौकालगत असलेल्या मैदानाचे रूपांतर तलावात झाल्यामुळे बच्चे कंपनीमध्ये नाराजी पसरली आहे. खारघर, सेक्टर 20 शिल्प चौकालगत सिडकोने उद्यान विकसित केले आहे. उद्यानाच्या आजूबाजूला दुकाने, शोरूम आहेत. या ठिकाणी नागरिकांची कायम वर्दळ असते. उद्यानात मुलांना खेळण्यासाठी झोपाळा, घसरगुंडी व इतर खेळणी असल्यामुळे सेक्टर 13, 20 आणि 21 मधील लहान मुलांची गर्दी असते. मैदानाचे सुशोभीकरण करताना सपाटीकरण योग्यरीत्या न केल्याने पावसाळ्यात मैदानात तळे साचते. त्यामुळे बच्चे कंपनीसह फिरायला येणार्यांची गैरसोय होत आहे. मैदानातील काही पथदिवेही बंद असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. याविषयी खारघर प्रभाग कार्यालयात विचारणा केली असता, उद्यानातील पाण्याचा निचरा व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगण्यात आले.