| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन सेवेतील घणसोली आगारात उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक बसला आज सकाळी सात वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीमध्ये घणसोली बस आगारात उभ्या असलेल्या जुन्या इतर 3 बसेस जळून खाक झाल्या आहेत. तर आगीचे नेमके कारण कळू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मेंटेनन्ससाठी उभ्या असलेल्या डिझेल बसला अचानक आग लागली. यावेळी या बसला लागून उभ्या केलेल्या तीन बस अशा चार बस जळून खाक झाल्या. यात तीन डिझेल तर एक इलेक्ट्रिक बसचा समावेश आहे. आग नेमकी कशा मुळे लागली आहे. याबाबत चौकशी केली जाणार आहे. अभियांत्रिकी विभागाकडून बसची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती महाव्यवस्थापक कडूसकर यांनी दिली. घणसोली डेपोत डिझेल बस मेंटेनन्ससाठी 28 मे पासून उभी होती. आज या बसला अचानक आग लागली. यामुळे एकूण चार बसगाड्यांचे नुकसान झाले. चालक वाहकांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला इतर उभ्या असलेल्या बस बाजूला नेण्यात यश आले आणि मोठी वित्तहानी टळली. बस आगारातील काही सतर्क कर्मचाऱ्यांमुळे त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने जीवितहानी टळली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, पण त्यापूर्वीच तीन बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या.