कृषी विभाग ॲक्शन मोडवर; बियाणे विक्रेत्यांवर होणार कारवाई
| अलिबाग | प्रमोद जाधव |
दरवर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी वणवण फिरावे लागते. बरेचदा नकली बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते. बनावट खते व कीटकनाशके शेतकऱ्यांना विकली जातात. शेतकऱ्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन कृषी व्यावसायिक शेतकऱ्यांची फसवणूक करतील, तर त्यांच्या कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. खरीपाच्या हंगामात शेतकऱ्यांना योग्य बियाणे, खत आणि कीटकनाशके वेळेत उपलब्ध व्हावीत तसेच त्यांच्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात यावर्षी खरिप हंगामातील सर्वसाधारण एक लाख 430 हेक्टर भातपिकाचे क्षेत्र आहे. खते, बियाणे आणि कीटकनाशके विक्रीची एकूण 611 दुकाने आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक करणारे दुकानदार आणि कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरावर एक आणि तालुकानिहाय 15 भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
भातपेरणीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या दुकानांमध्ये विक्रीला सुरुवात झाली आहे. खरीप हंगामासाठी 16 हजार मेट्रिक टन इतक्या रासायनिक खतांची मागणी प्राप्त झाले आहे. आतापर्यंत चार हजार 403 मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला आहे. नियोजनाप्रमाणे खते पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्यात भात बियाणे 16 हजार 250 क्विंटल मागणी नोंदविण्यात आली आहे. खते, बियाणे ज्यादा दराने विक्री करणे, अनधिकृत साठा करणे, तसेच इतर खतांची सक्ती करणे, विनापरवाना विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पवनकुमार नजन यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतं पाण्याने भरली गेली. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी होणारी धूळ वाफे पेरणी करण्यावर अडथळा निर्माण झाला. पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे. नांगरणी अथवा आधुनिक अवजारांच्या मदतीने पेरणी न करता, पारंपरिक पद्धतीने म्हणजे कुदळाने खोदकाम करून पेरणी केली जात असल्याचे चित्र जिल्ह्यात सुरु आहे.
भात, खते खरेदीसाठीदेखील शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. जिल्ह्यात यावर्षी खरिप हंगामातील सर्वसाधारण एक लाख 430 हेक्टर भातपिकाचे क्षेत्र आहे. खते, बियाणे आणि कीटकनाशके विक्रीची एकूण 611 दुकाने आहेत.बियाणे व खतांचे वितरण तालुकास्तरावरून वेगवेगळ्या दुकानांमध्ये करण्यात आले आहे. भात बियाण्यांचा पुरवठा मागील पंधरा दिवसांपूर्वी दुकानांमध्ये करण्यात आला आहे. या दुकानांमधून आतापर्यंत आठ हजार 975 क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दुकानांमध्ये वाढू लागली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी तालुकास्तरावर गुणनियंत्रण निरीक्षकांची नेमणूक केली आहे. या निरीक्षकांमार्फत बियाणांचे नमुने तपासणे, प्रयोगशाळेत नमुने पाठविणे, त्यानंतर विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. या गुणनियंत्रण निरीक्षकांची विक्रेत्यांवर नजर राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषद कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
भरारी पथकाची राहणार नजर
जिल्ह्यात खासगी, महाबीज व विद्यापीठाकडील आठ हजार 975 क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. जिल्ह्यात बियाणे 214, खते 265 व 132 कीटकनाशके विक्रीची दुकाने आहेत. जिल्हास्तरावर एक आणि तालुकास्तरावर 15 भरारी पथके कार्यरत आहेत. अनधिकृत, बोगस, निविष्ठ विक्री, केंद्र, उत्पादक कंपनीवर भरारी पथकाची नजर राहणार असल्याची माहिती मोहीम अधिकारी महेश नारायणकर यांनी दिली.
पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करा
हवामान खात्याच्या निर्देशानुसार, राज्यात दहा तारखेनंतर पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. शेतकऱ्यांनी पेरणी करताना घाई करू नये, पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषद कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
खते, बियाणे खरेदी करताना अशी घ्या काळजी
परवानाधारक कृषी केंद्राकडून बियाणे खते खरेदी करा.
विक्रेत्यांकडून खरेदीची पक्की पावती घ्या.
बियाणांची पाकिटे सीलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करा.
अंतिम मुदत तपासूनच बियाणे खरेदी करा.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी तालुकास्तरावर गुणनियंत्रण निरीक्षकांची नेमणूक केली आहे. या निरीक्षकांमार्फत बियाणांचे नमुने तपासणे, प्रयोगशाळेत नमुने पाठविणे, त्यानंतर विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार आहे. या गुणनियंत्रण निरीक्षकांची विक्रेत्यांवर नजर राहणार आहे.
पवनकुमार नजन,
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद