मृत्यूच्या छायेतून प्रवाशांचा प्रवास
| रत्नागिरी | प्रतिनिधी |
जुन्या रेल्वेगाड्या चालवणे आता प्रवाशांच्या जीवावर बेतण्यास सुरुवात झाली आहे. धावत्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या छताचा काही भाग नुकताच पडला. यावेळी प्रवासी थोडक्यात बचावले. या घटनेमुळे रेल्वे प्रवास मृत्यूच्या छायेतून होत असल्याची भावना प्रवाशांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस ही एक महत्त्वाची एक्स्प्रेस आहे. या एक्स्प्रेसमधून काही दिवसांपूर्वी एक युट्यूबर प्रवास करीत असताना रेल्वेगाडीच्या छताचा काही भाग पडला. मात्र, कोळे थोडक्यात बचावले होते. परंतु, या घटनेनंतर मत्स्यगंधा एक्स्प्रेसमधील बोंगळ कारभार प्रकाशझोतात आला आहे. तसेच, गेल्या 26 वर्षांत या रेल्वेगाडीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या रेल्वेगाडीचे डबे खराब झाले असून, मोडकळीस आले आहेत. गेल्या पाच वर्षांपासून प्रवासी संघटनाकडून या रेल्वेगाडीला लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डबे जोडण्याची मागणी रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळ आणि दक्षिण रेल्वेकडे करण्यात येत आहे. तर, जुलै 2024 रोजी उडुपी चिकमंगलुरू येथील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान मत्स्यगंधा एक्स्प्रेससाठी एलएचबी डबे जोडण्याची मागणीही केली होती. मात्र, या मागणीवर कोणतेही सकारात्मक पाऊल न उचलल्याने प्रवाशाचा जीव धोक्यात आला आहे.
मत्स्यगंधा एक्स्प्रेसच्या देखभाल दुरुस्तीचे काम दक्षिण रेल्वे विभागाकडे आहे. मात्र, एक्स्प्रेसच्या छताचा काही भाग पडल्यानंतर त्याची तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्ती करण्यात आली. तसेच, या घटनेची माहिती दक्षिण रेल्वेला देण्यात आली आहे. तर, पुढील कार्यवाही दक्षिण रेल्वेकडून केली जाईल, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.