| बोर्लीपंचतन | प्रतिनिधी |
ग्रामीण रस्त्यांच्या विकासाला अधिक गती देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजना’ सुरु केली. केंद्र शासनाच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर आखणी करण्यात आलेल्या या योजनेतून राज्यातील वाड्या, वस्त्या, गावांना रस्ते बांधून देण्याबरोबरच सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरावस्था झालेल्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे. परंतु, शासनाच्या या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याने वर्षभरातच त्यांची दुरावस्था होत आहे. त्यामुळे नागरिक आणि वाहन चालकांना याचा अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत व शहरवजा गाव असलेल्या बोर्ली पंचतन गावातील अंतर्गत रस्त्यांची प्रचंड प्रमाणात दयनीय अवस्था झाली असून, संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे. बोर्लीपंचतन ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोंडे पंचतन या गावाला जोडणाऱ्या 6 कि. मी. रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाले होते. 13 नोव्हेंबर 2023 रोजी सूरु करण्यात आलेले हे काम 15 मे रोजी पुर्ण करणे अपेक्षित असताना अद्यापही हे काम अपुर्णच आहे. मुळात अरुंद असणाऱ्या या रस्त्याला कायमच जड वाहतुकीचा फटका बसत असून, या रस्त्यावरून मार्गक्रमण करणारे पादचारी व वाहन चालकांना खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या परिसरात राहणारे रहिवासी व वाहन चालकांचा कंत्राटदाराविरोधात असणारा तीव्र संताप पाहता दोनच दिवसांपूर्वी संबंधित कंत्राटदाराने या रस्त्याच्या अपूर्ण असलेल्या कामाला सुरुवात केली आहे. परंतु, या रस्त्यावरून कायम होणाऱ्या जड वाहतूकीमुळे रस्त्याची पुन्हा तीच अवस्था होणार का? असा प्रश्न नागरिक व वाहन चालक विचारत आहेत.







