पाली बसस्थानकाची रखडपट्टी

नूतनीकरणाला मिळेना मुहूर्त; प्रवाशांची प्रचंड गैरसोय

| सुधागड-पाली | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पाली बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम मागील साडेतीन वर्षांपासून रखडले आहे. तसेच, स्थानकाला खड्डे, जुन्या तोडलेल्या इमारतीचे डेब्रिज, उघडा नाला, दुर्गंधी आदी विविध समस्यांनी वेढले आहे. परिणामी, येथील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. बसस्थानकाच्या दुरवस्थेकडे शासन व लोकप्रतिनिधी कोणाचेही लक्ष नाही, असे नागरिकांतून बोलले जाते.

अडीच वर्षांपूर्वी बसस्थानकाची जुनी धोकादायक इमारत तोडण्यात आली आहे. त्यावेळी स्थानक आवारात तात्पुरत्या स्वरूपाची निवारा शेड व स्वच्छतागृह बांधण्यात आले. निवारा शेड छोटी असल्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी अडचण होत होती. मात्र, त्यानंतर आजतागायत परिवहन महामंडळ अथवा कंत्राटदाराकडून तेथे कोणत्याही स्वरूपाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. स्थानकातील नाल्याचा स्लॅब तुटलेला आहे, त्यामुळे गाड्या ये-जा करण्यास अडथळा येतो. स्थानक आवारात नाले व गटारांतील सांडपाणी येते. त्यामुळे येथे खूप दुर्गंधी पसरली आहे. स्थानकात मोठे खड्डे पडले आहेत. प्रवाशांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे.

स्थानकाचे नूतनीकरण मार्गी लावण्यासाठी अनेकदा उपोषण केले आहे. याबाबत सातत्याने वरिष्ठ स्तरावरून अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन व निवेदन देऊन पाठपुरावा करत आहे. मात्र, अद्यापही कोणतीही उपाययोजना व ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रश्नांवर पुन्हा उपोषणाला बसणार आहे.

रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, पाली

नवीन आलेल्या आर्किटेक्टकडून स्थानकाचा आराखडा काही दिवसांत बनविण्यात येईल. मंजूर निधीच्या अनुषंगाने नवीन निधी ठरविला जाईल. त्यानंतर निविदा काढण्याची प्रक्रिया होईल.

मीनल मोरे, कार्यकारी अभियंता, राज्य परिवहन महामंडळ मुंबई प्रदेश
दुर्गंधी आणि गैरसोय
स्थानकाला संरक्षक भिंत नाही. स्थानकाच्या आवारात सांडपाणी येते. स्थानकात प्रवेश करतेवेळी दोन नाल्यांपैकी एका नाल्यावरील एक स्लॅब तोडला असल्याने गाड्यांना प्रवेश करण्यास व बाहेर जाण्यास अडथळा निर्माण होतो. या उघड्या नाल्यामुळे घाण व दुर्गंधी पसरते. स्थानकाच्या बाजूने प्रचंड झाडाझुडपे वाढली आहेत.
Exit mobile version