पाच वर्षांपासून नूतनीकरणाचे काम ठप्प
। पाली/बेणसे । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र व सुधागड तालुक्यातील मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पालीतील बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम मागील पाच वर्षांपासून रखडले आहे. नवीन इमारतीच्या पुनर्बांधणीस व नूतनीकरणास अजूनही सुरुवात झालेली नाही. तसेच स्थानकाला खड्डे, जुन्या तोडलेल्या इमारतीचे डेब्रिज, उघडे नाले, दुर्गंधी आदी विविध समस्यांनी वेढले आहे. परिणामी येथील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. बसस्थानकाच्या दुरावस्थेकडे शासन व लोकप्रतिनिधी कोणाचेही लक्ष नाही.
साधारणतः तीन वर्षांपूर्वी पाली बस स्थानकाची जुनी धोकादायक इमारत तोडण्यात आली आहे. त्यावेळी स्थानक आवारात तात्पुरत्या स्वरूपाची निवारा शेड व स्वच्छतागृह बांधण्यात आले. निवारा शेड छोटी असल्यामुळे प्रवाशांना बसण्यासाठी अडचण होते. मात्र त्यानंतर आजतागायत परिवहन महामंडळ अथवा कंत्राटदाराकडून तेथे कोणत्याही स्वरूपाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. जुन्या इमारतीचे डेब्रिज व राडारोडा स्थानकात तसाच पडला आहे. स्थानकातील नाल्याचा एका बाजूचा स्लॅब दुरुस्त करून तेथून अजूनही वाहतूक सुरु झालेली नाही. त्यामुळे बस एका बाजूनेच जातात व येतात त्यामुळे गाड्यांना ये-जा करण्यास अडथळा होतो. स्थानक आवारात पालीतील नाले व गटारांतील सांडपाणी येते. त्यामुळे येथे खूप दुर्गंधी पसरली आहे. स्थानकात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. प्रवाशांसाठी पिण्यासाठी चांगले पाणी देखील नाही. यामुळे स्थानिक नागरिक व प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे.
ठेकेदार काळ्या यादीत
नवीन बस स्थानक नुतनीकरणासाठी तब्बल 2 कोटी 36 लाखांचा निधी नोव्हेंबर-डिसेंबर 2019 मध्ये मंजूर झाला होता. तसेच इमारतीच्या प्रत्यक्ष बांधकामास जानेवारी 2020 पासून सुरुवात होणार होती. मात्र यावेळी काही अडचणी आल्याने ठेकेदाराने काम बंद केले. या ठेकेदाराला काळ्या यादीत देखील टाकण्यात आले. मात्र आजतागायत नवीन इमारतीची अजून एक वीट सुद्धा बसविण्यात आलेली नाही.
वाढीव निधी अपेक्षित
नवीन प्रस्ताव व आत्ताच्या बाजार भावाप्रमाणे हा निधी वाढण्याची शक्यता आहे. साधारणतः 12 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये नवीन सुसज्ज भव्य इमारतीसह विविध सुविधा आदींचा समावेश आहे.
आणखी उशीर
नवीन प्रस्तावास मान्यता मिळणे त्यानंतर निविदा काढणे नवीन ठेकेदार नेमणे या सर्व प्रक्रियेला आणखी उशीर होईल. आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर प्रत्यक्षात स्थानक पुनर्बांधणी काम पूर्ण होण्यास अधिक कालावधी जाण्याची शक्यता आहे.
दुर्गंधी आणि गैरसोय
स्थानकाला संरक्षक भिंत नाही. जुन्या इमारतीचा राडारोडा तिथेच बस स्थानकात खड्डे पडले आहेत. बस स्थानकाच्या आवारात पालीतील सांडपाणी येते. व हे दूषित पाणी साचून दुर्गंधी व घाण पसरली आहे. स्थानकाच्या बाजूने प्रचंड झाडाझुडपे वाढले आहेत. तसेच पाली बस स्थानक हे खाजगी वाहनांचे पार्किंगचे ठिकाण बनले आहे. शिवाय निवारा शेड अपूर्ण पडत आहे.
स्थानकाच्या बाजूने नाला जातो. त्यामुळे स्थानकामध्ये नाल्याचे पाणी साठते. स्थानकाची इमारत उंच करणे अपेक्षित आहे. जुन्या प्रशासकीय मान्यतेत व टेंडरमध्ये या सर्व गोष्टी नमूद नव्हत्या. त्यामुळे या सर्व गोष्टी नमूद करून सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी मध्यवर्ती कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. नूतनीकरणास अंदाजे 12 कोटी खर्च अपेक्षित आहे. प्रशासकीय मान्यता मिळाल्यावर लागलीच टेंडर काढले जाईल आणि पुढील प्रक्रिया वेगाने होईल.
– मीनल मोरे, कार्यकारी अभियंता
राज्य परिवहन महामंडळ मुंबई प्रदेश
स्थानकाचे नूतनीकरण व येथील समस्या मार्गी लावण्यासाठी अनेकदा उपोषण केले आहे. याबाबत सातत्याने वरिष्ठ स्तरावरून अधिकार्यांच्या भेटी घेऊन व निवेदन देऊन पाठपुरावा करत आहे. मात्र अद्यापही कोणतीही उपाययोजना व ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे या प्रश्नांवर पुन्हा उपोषणाला बसणार आहे.
– रवींद्रनाथ ओव्हाळ,
सामाजिक कार्यकर्ते, पाली