स्टार प्रवाहवरील मालिकांमधील दिग्गज कलाकारांची राहणार उपस्थिती
। अलिबाग । प्रतिनिधी ।
आपल्या लेखणीच्या माध्यमातून तळागाळातील घटकांना न्याय देणार्या रायगड जिल्ह्यातील कृषीवल वृत्तपत्रातर्फे दरवर्षी महिलांसाठी हळदी कुंकू सोहळ्योचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही खास महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन गुरुवारी (दि.16) पीएनपी नाट्यगृहात सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे. कृषीवलच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार्या सोहळ्यामध्ये स्टार प्रवाह वाहिनीतील वेगवेगळ्या मालिकेमधील सिनेतारका आकर्षण ठरणार आहेत. गेल्या अनेक वर्षापासूनची ही परंपरा जपण्यात आली आहे.
हळदी कुंकू म्हणजे प्रत्येक महिलांसाठी मानाचा दिवस मानला जातो. गेल्या अनेक वर्षापासून कृषीवलने महिलांचा हा सन्मान जपण्याचा प्रयत्न केला आहे. मकरसंक्रातीनिमित्त हळदी कुंकू समारंभ गेल्या अनेक वर्षापासून अलिबागमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वेगवेगळ्या स्तरातील 20 हजारहून अधिक महिला या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवितात. यंदादेखील महिलांच्या हक्काचे व सौभाग्याचे प्रतीक समजला जाणारा हळदी कुंकूचा समारंभ गुरुवारी सायंकाळी चार ते सात यावेळेत होणार आहे. यावर्षीदेखील कार्यक्रमाच्यावेळी सिनेतारकांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कलाकारांची राहणार उपस्थिती
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील काव्या तथा ज्ञानदा रामतीर्थकर, येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील मंजिरी तथा पुजा बिरारी, साधी माणसं या मालिकेतील मीरा तथा शिवानी बावनकर या तीन अभिनेत्रींबरोबरच सत्या तथा आकाश नलावडे या अभिनेत्याचीही उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे हळदी कुंकू समारंभाला या सिनेतारकांचे मोठे आकर्षण राहणार आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कृषीवलच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका तथा शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले आहे.