फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 31 जानेवारीपासून प्रारंभ
| पुणे | प्रतिनिधी |
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागातर्फे आयोजित तिसरे विश्व मराठी संमेलन यंदा पुण्यात होणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन होणार असल्याची घोषणा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी (दि.11) पत्रकार परिषदेत केली.
संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिलेच विश्व मराठी संमेलन आहे. यापूर्वीची दोन संमेलने अनुक्रमे मुंबई आणि नवी मुंबई येथे झाली होती.
सामंत यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय दर्जाचे लिखाण केलेल्या एका ज्येष्ठ साहित्यिकाचा आणि मराठी भाषेत कार्य करून आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या एका तरुणाचा सन्मान करण्याच्या उपक्रमाची या संमेलनापासून सुरुवात करीत आहोत. या अंतर्गत यंदा ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक आणि अभिनेते रितेश देशमुख यांचा गौरव करण्यात येईल. संमेलनात तरुण केंद्रस्थानी असतील.
संमेलनाबाबत पुण्यातील बहुतेक साहित्यिकांशी चर्चा झाली असून, त्यांच्या सूचना जाणून घेतल्या आहेत. त्यानुसार बालसाहित्यापासून संतसाहित्य आणि लोककलांपर्यंत प्रत्येक बाबीचा समावेश कार्यक्रमांत असेल. उद्घाटनाच्या दिवशी बालगंधर्व रंगमंदिरापासून फर्ग्युसन महाविद्यालयापर्यंत शोभायात्रा काढण्यात येईल. तरुण-ज्येष्ठ कवींचे काव्यसंमेलन, मराठी भाषेच्या अभिजात दर्जावरील चर्चासत्र, कार्यशाळा, परिसंवाद आदींचा समावेश संमेलनात असेल. याची सविस्तर कार्यक्रम पत्रिकाही लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही सामंत यांनी नमूद केले.
परदेशातील लेखक, साहित्यप्रेमींना आमंत्रणगतवर्षी विश्व मराठी संमेलनात परदेशातील मराठी व्यक्तींना संमेलनात बोलावण्यासाठी वारेमाप खर्च करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर यंदाच्या संमेलनात परदेशस्थ मराठी व्यक्तींच्या सहभागाबाबत सामंत म्हणाले, या व्यक्ती परदेशात राहत असल्या तरी आपल्या महाराष्ट्राच्याच आहेत. त्यांना संमेलनात सहभागी होता यावे, म्हणून गतवेळी प्रवासाचा खर्च देण्यात आला होता. यंदाही जगभरातील मराठी भाषिकांनी सहभागी व्हावे, असा आमचा प्रयत्न असेल.