नऊ हजारहून अधिक जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई;
सहा टोळ्यांसह 35 जणांची केली हकालपट्टी
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
गावांमध्ये खुलेआम गुंडगिरी करून दहशत निर्माण करणार्या गावगुडांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. या गावगुंडांना रायगडच्या पोलीस दलाने कारवाई करीत दणका दिला आहे. वर्षभरात नऊ हजारहून अधिक जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करीत 35 हून अधिक जणांबरोबरच सहा गुन्हेगारी टोळींना जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईने गावांतील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा प्रयत्न केला आहे.
रायगड जिल्ह्यात 28 पोलीस ठाणे आहेत. पोलिस अधीक्षक यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामीण भागासह शहरी भागात शांतता निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून वारंवार आवाहन केले जाते. तरीदेखील काही महाभाग आपल्या ताकदीच्या व पैशाच्या जोरावर गावांमध्ये गुंडगिरी करन दहशत निर्माण करीत असतात. किरकोळ कारणावरून मारहाण करणे, धमकी देणे. गावातील वहिवाटीचा रस्ता अडवून वेठीस धरणे अशा अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न गावगुंड कायमच करीत असतात. त्यांच्याविरोधात बोलणार्यांना त्रास देण्याचा प्रयत्न हे गावगुंड करीत असतात. काहींना राजकीय बळ मिळत असल्याने गावामध्ये भितीचे वातावरण निर्माण करतात. त्याचा नाहक त्रास गावांतील नागरिकांना होतो.
वेगवेगळ्या कामात सर्वसामान्यांचा अडकाव करीत असल्याचा प्रकार असतो. काही जण गावागावात टोळक्या तयार करून गुंडगिरी करतात. जिल्ह्यात सण, उत्सव यात्रा आदी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होतात. याचा फायदा घेत काहीजण कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतात. गावगुंडगिरी करणार्या तरुणांसह टोळक्याने राहून दहशत निर्माण करणार्या टोळीला देखील पोलिसांकडून वारंवार सुचना केल्या जातात. तरीदेखील काही मंडळी याकडे दुर्लक्ष करीत असतात. जिल्ह्यातील नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा, त्यांना भयमुक्त वातावरणात फिरता यावे यासाठी रायगड पोलिसांनी गुन्हेगारी टोळीसह गावगुंडाची माहिती घेण्याचे काम केले. त्यांना पोलिस ठाणे स्तरावर समजावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. तरीदेखील गावगुंडाची मक्तेदारी सुरुच राहिली.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलिसांनी वेगवेगळ्या पध्दतीने कारवाईची मोहिम यावर्षात आखली. जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीची माहिती घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली. मुंबई पोलीस अधीनिअम कलम 55 अन्वये सहा गुन्हेगारी टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार केल्या. मुंबई पोलीस अधिनिअम कलम 56 व 57 अन्वये जिल्ह्यातील 35 जणांना हद्दपार केले. नऊ हजार 514 जणांविरोधात विरोधात वेगवेगळ्या कलमाखाली प्रतिबंधात्मक कारवाई केली. जिल्ह्यात वाढत्या गुंडगिरीला रोखण्यासाठी रायगड पोलीसांनी कंबर कसली. काही गाव गुंडाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना कारागृहात पाठविण्याची व्यवस्थादेखील केली आहे. 2024 मध्ये लोकसभा व विधान सभा निवडणूका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करणे गरजेचे होते. त्यादृष्टीने पोलिसांनी कारवाई केली. तसेच जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन सुरु केले. या ऑपरेशनच्या माध्यमातून फरार आरोपींसह काही घातपात करण्याचा प्रयत्न करणार्या व्यक्तींना ताब्यात गेत त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईने गावगुंडांना खाकी वर्दीचा दणका मिळाला आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रायगड पोलीस कायमच प्रयत्न करीत आहे. या वर्षात विधानसभा व लोकसभा निवडणूका पार पडल्या. या कालावधीत काही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. या कालावधीत गावगुंडावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
– सोमनाथ घार्गे,
पोलीस अधीक्षक, रायगड