पाली बस स्थानकाची दुरावस्था

खड्ड्यांचे साम्राज्य अन्‌‍ धुळीचे लोट

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

प्रसिद्ध अष्टविनायक तीर्थक्षेत्र आणि सुधागड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या पाली येथील एस.टी. बसस्थानकाची दुरावस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. स्थानकाच्या नूतनीकरणासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. स्थानक आवारात पडलेले मोठमोठे खड्डे आणि धुळीच्या लोटांमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

काही महिन्यांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या ठिकाणी येऊन तीन महिन्यात स्थानकाच्या नूतनीकरणास सुरुवात होईल असे आश्वासन दिले होते. मात्र, पाच महिने उलटून गेले तरी देखील कोणतीच कार्यवाही सुरू झालेली नाही. स्थानकात गाडी आल्यावर जणू काही आपण समुद्राच्या लाटांवर स्वार झालो आहोत, असा भयावह अनुभव प्रवाशांना येत असून प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यात येथे साचलेल्या चिखलातून वाट काढणे कठीण होते, तर आता उन्हामुळे उठणाऱ्या धुळीच्या लोटांनी (धुरळ्याने) प्रवासी आणि स्थानिक व्यावसायिक हैराण झाले आहेत. स्थानकातील खड्ड्यांमुळे प्रवाशांना चालणेही अवघड झाले आहे. याशिवाय, स्वच्छतागृहांची झालेली दुरावस्था आणि उघड्या नाल्याची दुर्गंधीमुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बसस्थानक नूतनीकरणाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, आर्थिक मंजुरीसाठी प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालयातील सक्षम प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. ही मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आमच्या कार्यालयामार्फत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल.

मीनल मोरे,
कार्यकारी अभियंता,
राज्य परिवहन महामंडळ
Exit mobile version