अब्दुलहक खलफे करणार येत्या 5 मेरोजी लाक्षणिक उपोषण
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील सवाद ते कालवली पर्यंतच्या रस्त्याची सध्या प्रचंड दूरवस्था झाली असून या दूर्दशेवर उपाययोजना तसेच तातडीची दुरूस्ती करण्याऐवजी भोराव ते निगडे असा हा रस्ता ठरवून महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता वर्ग करून पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून हा रस्ता काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता निविदा प्रक्रियेत असताना या रस्त्याची दुरूस्तीदेखील पोलादपूर उपविभागाकडून करण्यात येणार नसल्याने नवीन पेच निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या तातडीने दुरूस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहक खलफे यांनी दि.5 मे रोजी पोलादपूर तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे लेखी निवेदन पोलादपूर तहसिल कार्यालयामध्ये दिले आहे.
पोलादपूर तालुक्यातील माटवण, सवाद, कणगुले, वावे, धारवली, कालवली, हावरे या सात गावांसाठी हा रस्ता आवश्यक असताना तो महाड तालुक्यातील राजेवाडी ते भोर घाटरस्त्यावरील भोराव फाटयापासून सुरू झाला आहे म्हणून धारवली आंग्रेकोंड येथून निगडे या महाड तालुक्यातील वरंध घाटापर्यंत नेण्याचा प्रस्ताव महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तयार करण्यात येऊन निविदाप्रक्रियाही लवकरात लवकर पूर्ण होऊन कोणत्या ठेकेदार कंपनीला ई-निविदा मिळणार हेदेखील निश्चित करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे सद्यस्थितीत हा नियोजित रस्ता सुमारे 8 कोटी निविदेचा असताना माटवण ते कालवली या सप्तक्रोशीतील मूळरस्त्यावर दुरूस्तीसाठी खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग धजावत नसल्याचे दिसून येत आहे. दरम्यान माटवण ते कालवलीपर्यंतच्या रस्त्याची दुरूस्ती पावसाळयापूर्वी न झाल्यास सप्तक्रोशीतील ग्रामस्थांचे पुढील चार महिने अतोनात हाल होणार असल्याने सामाजिक कार्यकर्ते अब्दुलहक खलफे यांनी पोलादपूर तहसिल कार्यालयाला निवेदनाद्वारे दि.5 मे रोजी तहसिल कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.