उरण | वार्ताहर |
तालुक्यातील सारडे, वशेणी, पुनाडे आणि पनवेलच्या केळवणे गावापर्यंतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या मार्गाच्या दुरुस्तीची निविदा काढण्यात आली असून त्यासाठी पावसाळा जाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र, तोपर्यंत येथील प्रवाशांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागणार आहे.
उरण, पेण आणि पनवेल या जिल्ह्यांतील तिन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या पिरकोन फाटा ते केळवणे रस्ता आहे. या मार्गावरून वशेणी गावापर्यंत सध्या नवी मुंबई महानगरपालिकेची जुईनगर ते वशेणी अशी एनएमएमटीची वातानुकूलीत बस सेवा सुरू आहे. या सेवेमुळे उरण पनवेल व पेण तालुक्यातील प्रवाशांना थेट प्रवासाची सुविधा झाली आहे. नवी मुंबईचाही प्रवास सुखकर झाला आहे. मात्र, येथील रस्ता नादुरुस्त झाला आहे. या रस्त्याला अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून येथील प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
या रस्त्याच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून, कामाची मंजुरी देणे बाकी आहे. ती दिल्यानंतर रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उरणाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त अभियंता नरेश पवार यांनी दिली.